ICSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर, मुंबईची जुही कजारिया देशात सर्वप्रथम
आयसीएसईच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवण्याची कामगिरी यापूर्वी कोणालाही करता आली नव्हती.
मुंबई: भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा (आयसीएसई) परिषदेचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये दहावीच्या परीक्षेत ९८.५४ तर बारावीच्या परीक्षेत ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर मुंबईच्या जुही कजारियाने देशातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. तिला ९९.६० टक्के मिळाले. तर मुंबईच्या फोरम संजनवाला, अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याच्या यश भंसाली यांनी संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावला. या सर्वांना ९९.४० टक्के मिळाले आहेत. तर झरवान श्रॉफ, जुगल पटेल आणि ओजस देशपांडे संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या तिघांनाही ९९.२० टक्के मिळाले.
तर बारावीच्या परीक्षेत कोलकात्याच्या देवांग कुमार अगरवाल आणि बंगळुरुची विभा स्वामीनाथन यांनी अव्वल क्रमांक पटकावला. या दोघांनाही १०० टक्के गुण मिळाले आहेत. आयसीएसईच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवण्याची कामगिरी यापूर्वी कोणालाही करता आली नव्हती. विद्यार्थ्यांना cisce.org, results.cisce.org, examresults.net, result.gov.in, indiaresults.com या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येईल.
यंदा आयसीएसई बोर्डाकडून २६ फेब्रुवारी ते २८ मार्च या काळात दहावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तर ४ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती.