नवी दिल्ली : जम्मू-काश्मीमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून आयईडी बॉम्बद्वारे सुरक्षादलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास पुलवामा जिल्ह्यातील त्रालमधील अमलर भागात दहशतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला आहे. आयईडी हल्ल्यानंतर जम्मू - काश्मीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेला हा बॉम्बहल्ला १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या हल्ल्यासारखाच सुरक्षादलाच्या ताफ्यावर होणार होता. परंतु सुरक्षादल तिथून जाण्याआधीच हा बॉम्बस्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामामध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या सुरक्षादल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्यासह पाच सुरक्षारक्षक शहीद झाले होते. 


राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सलग आठव्या दिवशी गोळीबार करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांकडून शुक्रवारी सकाळी कुपवाडात शोधमोहिम सुरू करण्यात आली. शोधमोहिम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांकडून सुरक्षादलावर गोळीबार करण्यात आला. यात नऊ सुरक्षारक्षक जखमी झाले असून पाच सुरक्षारक्षक शहीद झाले आहेत.