IIT Placement Offers : देशात एककीकडे बेरोजगारीची समस्या डोकं वर काढत असताना दुसरीकडे उच्चशिक्षिक तरुणांना नोकरीच्या संधी चालून येत आहेत. जगभरात मोठ्या कंपन्यांमधून कपात चालू असताना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विद्यार्थ्यांना विक्रमी पगाराच्या ऑफर मिळत आहेत. आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) विद्यार्थ्यांवर गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांचा पाऊस पडला आहे. एका विद्यार्थ्याला चार कोटी रुपयांचे विक्रमी पॅकेज मिळाले आहे. न्यूयॉर्कमधील जेन स्ट्रीट (Jane Street) या कंपनीने ही ऑफर दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे वार्षिक पॅकेज


आयआयटीमध्ये 1 डिसेंबरपासून प्लेसमेंट सुरू झाल्या आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, दिल्ली, कानपूर आणि मुंबई आयआयटीच्या किमान तीन विद्यार्थ्यांना वार्षिक 4 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. तर आयआयटी मद्रासमधील (IIT Madras) 25 विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. गेल्या वर्षी, उबेरने सर्वाधिक 2.16 कोटी रुपयांच्या पगाराचे पॅकेज दिले होते.


पहिल्याच दिवशी देशातील आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आयआयटीयन्सना 519 जॉब ऑफर दिल्या आहेत. या वर्षी मिळालेली 1.90 कोटींची भारतीय कंपनीतर्फे दिलेली सर्वात मोठी ऑफर आहे.


आकर्षक पगाराच्या ऑफर्स


1 डिसेंबरपासून सुरू झालेल्या 2022-23 प्लेसमेंटच्या पहिल्याच भागात विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजच्या जॉब ऑफर देण्यात येत आहेत. यावर्षी कॅपिटल वन, एसएपी लॅब्स, राकुटेन मोबाइल, एनफेस, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, बेन अँड कंपनी, मॅककिन्से अँड कंपनी यांनी आकर्षक पगाराच्या ऑफर्स आयआयटीच्या विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.


प्लेसमेंटमध्ये 78 स्टार्ट अप


पहिल्या टप्प्यातील प्लेसमेंट 15 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. यासाठी एकूण 1269 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यादरम्यान, 260 हून अधिक कंपन्या प्लेसमेंटसाठी येणार आहेत, ज्या 470 विद्यार्थ्यांना नोकऱ्या देतील. या कंपन्यांमध्ये 78 स्टार्ट अप आणि 5 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश आहे.