नवी दिल्ली : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. पण आता थंडीच्या कडाक्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २० आणि २१ जानेवारी रोजी पर्वतीय भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात काही भागात दाट धुक्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागानुसार, पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि ओडिशामधील काही भागात दाट धुकं असू शकतं. धुक्यामुळे तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.


कच्छ, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील २४ तासांत शीतलहरीचा परिणाम दिसू शकतो. शीतलहरींमुळे थंडीच्या कडाक्यात अधिक वाढ होऊ शकते.


दिल्लीत दाट धुक्यासह कमाल तापमान १६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ९ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. झारखंडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरप्रदेश तसंच दिल्लीतील काही भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 


जम्मू-काश्मीरमध्येही गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. अनेक जिल्ह्यातील भागात हिमस्खलन झाले आहे. 


दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये पारा २.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला होता. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात २.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.


मुंबईतही पारा रात्री १२.३ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेला होता. हे या मौसमातलं मुंबईतलं सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं. थंड वाऱ्यांमुळे तपमानात घट झाली. मुंबईत गारठा राहण्याची शक्यता असल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.