Viral News: आईची माया? पैसे नसल्याने लेकिकडे जाण्यासाठी दिव्यांग आईचा व्हिलचेअरवरुन 8 दिवसात 180 किमी प्रवास
Viral News: एका 90 वर्षांच्या दिव्यांग महिलेने आपल्या लेकीकडे जाण्यासाठी व्हिलचेअरवरुन तब्बल 180 किमीचं अंतर कापलं. ज्या वयात माणसाला धड चालताही येत नाही, त्या वयात या महिलेने सलग आठ दिवस प्रवास केला.
Women Traveling 180KM on Tricycle To Meet Daughter Video: मध्य प्रदेशच्या अशोकनगरमध्ये (Madhya Pradesh) मन सु्न्न करणारी एक घटना समोर आली आली. आपल्या मुलीला भेटण्यासाठी एका वयोवृद्ध दिव्यांग महिलेने (Old Disabled Women) व्हिलचेअरवरुन (Wheel Chair) तब्बल 180 किलोमीटर प्रवास केला. लेकीला भेटायला जाण्यासाठी या महिलेने काही दिवस पैसे गोळा केले. पण तिच्यापर्यंत पोहचू शकेल इतके पैसे तिला जमवता आले नाही. पैसे नसल्याने बस चालकाने त्या महिलेला घेऊन जाण्यास नकार दिला. अखेर या महिलेने मनाशी निश्चय केला. ज्या वयात माणसाला धड उभंही राहाता येत नाही, त्या वयात या महिलेने तब्बल आठ दिवस व्हिलचेअर चालवत मुलीचं घर गाठल.
90 वर्षांची ही महिला खाण्या-पिण्याचं जेमतेम सामान घेऊन व्हिलचेअरवरुन आपल्या मुलीला भेटण्यासाठी निघाली. कडक उन्हात रस्त्याने निघालेल्या या वृद्ध महिलेला रस्त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ज्या ठिकाणी रस्ते उंचवठे होते, त्या ठिकाणी ही माऊली व्हिलचेअरवरुन खाली उतरायची आणि हाताने व्हिलचेअर ढकलत पुढे घेऊन जायची.
चेहऱ्यावर सुरकुत्या, कापणारा आवाज आणि पायाने चालता येत नाही, अशी परिस्थितीत ही महिला मध्य प्रदेशमधल्या अशोक नगरमधून आपल्या मुलीला भेटण्यासाठी निघाली. अशोकनगरपासून 180 किलोमीटरवर तिची विवाहित मुलगी राहते. काही जणांनी या वृद्ध महिलेचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले.
सरकारी योजनांवर प्रश्नचिन्ह?
या वृद्ध महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाल्यानंतर सरकारी योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. वृद्ध नागरिकांसाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जातात. करोडो रुपये खर्च केले जातात. पण जे खरे गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत या योजना कधी पोहोचतच नाही. मग करोडो रुपये जातात कुठे असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय. केवळ पैसे नसल्याने बस चालकाने या महिलेला बसमधून नेण्यास नकार दिला. ती महिला वृद्ध आणि दिव्यांग आहे, हे पाहून ही त्या बस चालकाच्या ह्दयाला पाझर कसा फुटला नाही, असा सवालही या निमित्ताने समोर येतो.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ राजगड-पाचोरा हायवेवरचा असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य प्रदेशमधल्या अशोकनगर इथं ही वृद्ध महिला एकटी राहाते. आपल्या मुलीला भेटण्याची तिला इच्छा झाली. पण गावात संपर्क करण्याचं काहीच साधन नाही, जवळ पैसे नाहीत अशा परिस्थितीत ती महिला लेकीला भेटण्यासाठी निघाली होती.