पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून आज डॉ. प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी प्रमोद सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासह 8 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अन्य 7 राज्यांचे मुख्यमंत्रीही या शपथविधी सोहळयाला उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सोहळ्याआधी शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी सादर केली. यात आमदार विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांचा समावेश आहे. 


डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात विश्वजीत राणे यांना दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं पद मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपला मदत करणाऱ्या अपक्ष आमदारांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, आजच्या शपथ घेणाऱ्या आमदारांमध्ये त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे या आमदारांना कॅबिनेटमध्ये संधी मिळणार का की भाजप अन्य वेगळी खेळी खेळणार याची उत्सुकता आहे.