महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार, महाविकास आघाडीकडे...
Maharashtra Vidhan Sabha Election Results: महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार आहे. निकालानंतर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. महायुतीचे सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीने तब्बल 226 जागांचा आकडा पार केला आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला 50चा आकडादेखील गाठता आला नाहीये. या निवडणुकीबरोबरच महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील घडली नसेल अशी गोष्ट घडली आहे.
महाविकास आघाडीला 50 जागांचा आकडाही पार करता आला नाहीये. काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंना 20 तर, शरद पवारांच्या पक्षाला 10 जागांवर विजय मिळवता आला आहे. महाविकास आघाडीकडे जागांची संख्या कमी असल्याने आता त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळं राज्यात प्रथमच विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद नसणार. त्यासंदर्भात एक नियमही सांगितला जातो.
नियानुसार, विरोधीपक्ष नेते होण्यासाठी कोणत्याही पक्षाला 10 टक्के जागा मिळवणे अपेक्षित असते. 288 पैकी कोणत्याही पक्षाचे किमान 29 आमदार असणे गरजेचे आहे. आत्ताची परिस्थीती पाहता महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाकडे तितके संख्याबळ नाहीये. एकाही पक्षाला 29 चा आकडा गाठता येणार नाहीये. त्यामुळं राज्यात विरोधीपक्षनेतेपद नसणार, अशी स्थिती सध्या आहे.
मात्र, महाविकास आघाडी असल्याने तिन्ही पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्षनेते पदावर दावा करु शकतात. मात्र विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. त्यामुळं आता महायुतीचे सरकार आल्यानंतर पुरेसे संख्याबळ नसताना किंवा महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ मान्य करणार का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
महायुतीला किती जागा?
भाजपने 2024 मध्ये 149 जागांवर निवडणूक लढवत तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याचबरोबर, शिंदेसेनेला 57 जागा आणि अजित पवारांच्या पक्षाला 41 जागांवर विजय मिळवला आहे.
लोकसभेत दहा वर्ष विरोधी पक्षनेता नव्हते
लोकसभेत 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद नव्हते. दोन्ही वेळेला कोणत्याही पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळं लोकसभेत विरोधी पक्षनेताच नव्हता. 2024 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 99 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळं आता लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मिळाले आहे.