coronavirus : जगभरात सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश
भारताने कोरोना चाचण्यांच्या बाबतीत रिकोर्ड केला आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, भारताने कोरोना चाचण्यांच्या बाबतीत रिकोर्ड केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी देशात रिकॉर्ड संख्येने 11,72,179 चाचण्या केल्या आहेत. तर आतापर्यंत भारतात 4,55,09,380 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसंच जगात दररोज सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात साडे चार लाखहून अधिक चाचण्या केल्या आहेत. जगभरात सर्वाधिक कोरोना चाचण्या करणारा भारत दुसरा देश आहे. मोठ्या प्रमाणात केलेल्या चाचण्यांमुळे, संसर्गाची लवकर माहिती मिळाली आणि यामुळे संसर्गग्रस्तांना क्वारंटाईन करण्यास किंवा रुग्णालयात भरती करण्यास मदत मिळाली. देशभरात प्रयोगशाळांच्या वेगवान विस्तारामुळे चाचण्यांमध्येही वाढ झाली आहे. भारतात सध्या 1623 लॅब असून त्यापैकी 1022 सरकारी तर 601 खासगी लॅब आहेत.
भारतात कोरोनाचा मृत्यूदर 1.75 टक्के झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 77.09 टक्के इतकं आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या 38,53,406 झाली असून आतापर्यंत 67,376 जणांचा मृत्यू झाला आहे.