Chinese phones : गेल्या काही दिवसांपासून भारताने चिनी स्मार्टफोन (Chinese Smartphone) कंपन्यांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतात नफा कमवून तो गैरमार्गाने चीनमध्ये (China) पाठवल्याबद्दल ईडीने चिनी स्मार्टफोन ब्रँड विवोवर (Vivo) काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. करचुकवेगिरी केल्याप्रकरणी ईडीने (ED) विवोच्या देशभरातील कार्यालयांमध्ये छापे टाकले होते. त्याआधी ईडीने एमआय, रेडमी आणि पोक्को या ब्रँड नावाने भारतात मोबाईल फोन विकणाऱ्या शाओमी इंडियावर (xiaomi) मनी लॉड्रिंग केल्याच्या (money laundering) आरोपाखाली करत कंपनीची 5,551.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र भारतात चिनी स्मार्टफोनची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत असल्याने या कंपनीचे मोबाईल असणाऱ्या ग्राहकांनी धास्ती घेतली होती. त्यानंतर आता भारत सरकारने चिनी स्मार्टफोन कंपन्यांना आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे.


गलवान संघर्षानंतर भारताने 300 पेक्षा अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर आता भारतात चिनी मोबाईल फोनवर बंदी येण्याची शक्यता आहे. मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इतर सारख्या देशांतर्गत ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार चिनी स्मार्टफोन विकण्यावर बंदी घालण्याची योजना आखत आहे. सरकार चायनीज स्मार्टफोन निर्मात्यांना 12,000 रुपये ($150) पेक्षा कमी किमतीत उपकरणे विकण्यावर बंदी घालू इच्छित आहे.


ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार, 12 हजारांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या चिनी स्मार्टफोनवर बंदी घालण्यात यावी अशी सरकारची इच्छा आहे. जर असे झाले तर मोठ्या चिनी मोबाईल कंपन्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण चिनी कंपन्यांनी कमी किंमतीमध्ये अनेक फिचर्स असणारे स्मार्टफोन देशात उपलब्ध करुन दिले आहेत आणि त्यांचा ग्राहकवर्गही मोठा आहे.


चीनच्या नंतर भारत हा मोबाईल कंपन्यांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या प्रकरणाशी परिचित लोकांच्या म्हणण्यानुसार, 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चायनीज फोनवर बंदी घालण्याचे उद्दिष्ट म्हणजे चिनी दिग्गजांना भारतीय फोन बाजारपेठेतून बाहेर काढणे आहे. रिअलमी आणि ट्रान्शन (Tecno, Itel आणि Infinix) सारखे चीनी ब्रँड भारतीय मोबाईल मार्केटमध्ये तळाशी आहेत.


दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर शाओमी सारख्या मोठ्या चिनी मोबाईल कंपन्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मार्केट ट्रॅकर काउंटरपॉईंटच्या मते, जून 2022 च्या तिमाहीत भारतातील 12 हजारपेक्षा पेक्षा कमी किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचे योगदान एक तृतीयांश आहे. ज्यामध्ये चिनी कंपन्यांचा हिस्सा 80 टक्के होता. 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत, भारतात विकल्या गेलेल्या एक तृतीयांश फोनची किंमत 12,000 रुपयांपर्यंत होती. त्यातही 80 टक्के चिनी कंपन्यांचे फोन होते.