भारताकडून परराष्ट्र मंत्र्यांची बैठक रद्द, पाकची आगपाखड
`जगानं हे पाहायला हवं की पाकिस्ताननं स्थितीनुसार सकारात्मक मार्ग स्वीकारलाय...`
इस्लामाबाद : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी शुक्रवारी भारताद्वारे येत्या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये होणारी बैठक रद्द होणं, हे दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांची हत्या आणि दहशतवादाचा निषेध करत भारतां पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत भारतीय परराष्ट्र मंत्र्यांची प्रस्तावित बैठक शुक्रवारी धुडकावून लावली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभे दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यासोबत बैठक करणार होत्या.
कुरैशी यांनी डॉन ऑनलाईनशी बोलताना भारताचं हे पाऊल दुर्दैवी असल्याचं म्हटलं. 'आम्ही अगोदरच सांगितलं होतं की भारतानं एक पाऊल पुढे टाकलं तर आम्ही दोन पावलं पुढे टाकू... परंतु, यामुळे असं दिसतंय की केवळ एक पाऊल पुढे टाकून त्यांचा तोल गेला. जगानं हे पाहायला हवं की पाकिस्ताननं स्थितीनुसार सकारात्मक मार्ग स्वीकारलाय... परंतु, भारताची मात्र पुढे येण्याची इच्छा नाही' असं कुरैशी यांनी म्हटलंय.
भारत सरकार आंतरिक दबावाचा सामना करताना दिसतंय, असंही त्यांनी म्हटलंय. ही एक संधी होती जी भारतानं गमावलीय. चर्चा केवळ परपस्पर आदर परिस्थितीत होऊ शकते. जर ते यासाठी उत्सुक नसतील तर आम्हालाही घाई नाही, असंही सांगायला ते विसरले नाहीत.