भारतरत्न सन्मानाच्या मी कितपत योग्य आहे मला माहीत नाही- प्रणव मुखर्जी
`मी भारतरत्न सन्मानाच्या कितपत योग्य आहे मला माहीत नाही`, असे दु:ख माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
कोलकाता : 'मी भारतरत्न सन्मानाच्या कितपत योग्य आहे मला माहीत नाही', असे दु:ख माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्यात ते बोलत होते. प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर पुस्तक मेळा आणि साहित्य उत्सवच्या आयोजकांनी त्यांना सन्मानीत केले. या सन्मानाचे उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. 26 जानेवारीच्या पुर्वसंध्येला प्रणव मुखर्जी यांना 'भारतरत्न' देण्याची घोषणा करण्यात आली. त्यांच्यासोबत समाजसेवक नानाजी देशमुख आणि गायक-संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली.
पुर्व पाकिस्तानमध्ये बांगलाला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीवरून झालेल्या आंदोलनानंतर 1971 मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाल्याची आठवण प्रणव मुखर्जी यांनी सांगितली. काही दिवसांपूर्वीच मी 84 वर्षांचा झालोय. आता मी तंदुरूस्त आहे. राष्ट्रपती पदातून मुक्त झाल्यानंतर गेल्या दीड वर्षात मी देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन साधारण 2 लाख 63 हजार किलोमीटरचा प्रवास केल्याचेही त्यांनी सांगितले. भारताबाहेर केवळ बांगलादेशच्या चटगावचा दौरा केल्याचेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यात कवी शंख घोष यांनी बांगलादेश पुस्तक मेळ्याचे उद्घाटन केले. त्यावेळी मी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी लिहीलेला एक लेख वाचला. तेव्हा त्यांच्या आणि माझ्या दु:खात काही फरक नसल्याचे प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या लेखाने प्रणव मुखर्जींच्या बालपण आणि महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. जर सरकारी कामात फसलो नसतो तर मी देखील पुस्तक मेळ्याचा एक भाग झालो असतो. एका सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे मी देखील पुस्तक मेळ्यात सहभागी व्हायचो असेही त्यांनी यावेळी सांगितले.