मुंबई : आज हा कोळसा ही मोठी गरज बनली आहे. भारतातील थर्मल पॉवर प्लांट्समध्ये 75 टक्क्यांहून अधिक वीज ही कोळशापासून तयार केली जाते. भारतात जेव्हा गेल्वे गाड्या धावू लागल्या तेव्हा त्या कोळशावर धावत होत्या. कोळशाच्या साठ्यामध्ये भारत हा पाचव्या क्रमांकावर आहे. तर उत्पादनाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. कोळसा मंत्रालयाच्या मते, भारतात 319 अब्ज टन कोळशाचा साठा आहे. कोळशाचे सर्वात मोठे साठे अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील कोळसा खाणकामाची कथा सुमारे 250 वर्षांपूर्वी सुरू झाली. कोळसा मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 1774 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने नारायणकुडी परिसरात पहिल्यांदा कोळशाचे उत्खनन केले. नारायणकुडी पश्चिम बंगालच्या राणीगंजमध्ये येते. पण हा तो काळ होता जेव्हा औद्योगिक क्रांती झाली नव्हती आणि कोळशाची मागणी खूप कमी होती.


सध्या भारताकडे 319 अब्ज टन कोळशाचे साठे आहेत, परंतु असे असतानाही कोळशाचे संकट अधिक गडद झाले आहे. कोळसा संकटामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची भीतीही वाढली आहे. तर काही भागात लोड शेडिंग देखील सुरु करण्यात आली आहे. भारतातील सर्वात जास्त कोळशाचा साठा झारखंडमध्ये आहे. त्यात 83 अब्ज टनांहून अधिक कोळशाचा साठा अजूनही उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो.


मग तरीही कोळशाचे संकट का?


भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक देश आहे. परंतु असे असतानाही भारतात कोळशाचे संकट का गडद होत आहे? असा प्रश्व उद्भवतो. तर यामागचं कारण आहे त्याची मागणी आणि पुरवठ्याचा खेळ.


ऊर्जा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 29 एप्रिल रोजी देशातील विजेच्या मागणीने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. 28 एप्रिल रोजी देशात विजेची मागणी 2.07 लाख मेगावॅट होती. मात्र एवढी मागणी असून कोळशाचा पुरवठा तेवढा होत नाही. यामुळेच रेल्वेने 650 हून अधिक पॅसेंजर गाड्या देखील रद्द केल्या आहेत, जेणेकरून लवकरात लवकर वीज प्रकल्पात कोळसा पोहोचवता येईल.


कोळशापासून वीज निर्माण करण्यासाठी औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये किमान २६ दिवसांचा कोळसा साठा असायला हवा, पण देशात असे अनेक प्रकल्प आहेत जिथे 10 दिवसांपेक्षा कमी कोळसा शिल्लक आहे. तर काही असे प्लांट आहेत, जिथे फक्त एक किंवा दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा पोहोचलेला असतो. ज्यामुळे मग लोड शेडिंगचा मार्ग अवलंबल्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध होत नाही.


भारतामध्ये दररोज 4 लाख मेगावॅट पेक्षा जास्त म्हणजेच 400 GW वीज निर्मिती करण्याची क्षमता आहे. यातील निम्म्याहून अधिक वीज कोळशापासून निर्माण केली जाते. यातील बहुतांश वीज ही देशांतर्गत कोळशापासून तयार केली जाते.


सरकारी आकडेवारीनुसार, सध्या देशातील 165 पैकी 100 पॉवर प्लांटमध्ये 25 टक्क्यांहून कमी कोळशाचा साठा शिल्लक आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये कोळसा मंत्री आरके सिंग यांनी लोकसभेत सांगितले की 2024-25 पर्यंत कोळशाचे उत्पादन वार्षिक 1 अब्ज टनांपेक्षा जास्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.