नवी दिल्ली : फिरस्तीवर जाणाऱ्यांसाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताचं अनन्यसाधारण महत्त्वं असतं. हा सूर्य तोच, पण तरीही त्याची नानाविध रुपं पाहताना येणारे अनुभव या प्रवासवेड्या मंडळींसाठी प्रत्येक वेळी एक नवी पर्वणी आणणारे ठरतात. हे अनुभव अनेकदा शब्दांपेक्षा भावनांतूनच अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही फोटोंतून याचा प्रत्यय येत आहे. 


जिथं सूर्यदेवाच्या पहिल्यावहिल्या किरणांचा स्पर्श होताच, एका तरुणीची कांती झळाळून निघाली आणि त्या निर्मळ स्पर्शानं तिच्या डोळ्यांतून नकळत पाणी घळाघळा वाहू लागलं. अर्थात तिच्या आसवांचा बांध फुटला.


पूनम चौधरी असं या मुलीचं नाव असून, तिनं आपला अनुभव सांगताना ते क्षण शब्दांत मांडण्याचा पूर्ण प्रय़त्न केला. 


वाचा अंगावर शहारा आणणारे तिचे शब्द... 
'ती म्हणाली होती, सूर्याचा पहिला किरण त्रिशूळ पर्वताच्या शिखरावर पडेल आणि दुसरा तुझ्यावर जर तू वेळेत तिथे पोहोचलीस. त्या मुलीचेच शब्द कानात ठेवून मी झोपले. 


पर्वतरांगांनी माझ्यासाठी भावनिक खेळ रचलाय याची मला पुसटशी कल्पना होती. 


तुम्ही आयुष्यभर एका भीतीत असता. भीती असते एकटेपणाची, काहीतरी गमावण्याची, अपयशाची, दुसरे काय विचार करतीय याची, भीती असते इतरांच्या अपेक्षा पूर्ण करु की नाही याची.


पण, त्या सूर्याच्या पहिल्या किणाने जणू या यंत्रणेत जादूई कामगिरी केली. पर्वतांनी माझ्यातलं काहीतरी तिथेच सोडून जाण्याची जणू आर्जव केली. 


एखादी अशी गोष्ट जिच्यासोबत तुम्ही जगू इच्छित नाही. माझ्यातील नकारात्मकता कायमची बाहेर टाकण्यासाठीच या ट्रेकनं मदत केली नाही, तर माझ्यात मोठे बदलही घडवले. 


शारीरिक, मानसिक, भावनिकरित्या मला कणखर आणि सक्षम केलं. माझ्यावर विश्वास ठेवायला शिकवलं. 


मला एक आनंदी व्यक्ती बनवलं. माझे पाय जमिनीवर आणले, कारण आपल्यापेक्षाही काहीतरी मोठं तिथे उभं आहे याची ती जाणीव होती. 


या ट्रेकनं मला निसर्गाच्या जवळ नेलं. त्याच्याप्रती जबाबदार केलं. स्वत:च्या जवळ केलं.


हा फक्त ट्रेक नाही, तर एक असा अनुभव आहे जो सर्वांनीच जीवनात एकदातरी घ्यावा', असं पूनमनं लिहिलं. 



तिचा हा अनुभव फक्त एका पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचण्याबाबतचा नव्हता. तर, तिचा हा अनुभव होता एका अशा शक्तीच्या सानिध्ध्याचा जो एक व्यक्ती म्हणून आपल्याला पुरता बदलण्याची क्षमता बाळगतो. 



अतिशय सुरेख शब्दांत तिनं हा अनुभव मांडला आणि पाहता पाहता तिच्या माध्यमातून सर्वांनीच त्या सूर्याच्या पहिल्या किरणांचा स्पर्श अनुभवला.