भारताकडून HSTDV तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; हायपरसॉनिक मिसाईल क्लबमध्ये प्रवेश
भारत आता येत्या पाच वर्षांत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करू शकेल.
रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: देशात हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर (एचएसटीडीव्ही) तयार करण्यात भारताला यश आले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ( डीआरडीओ) हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ओडिशाच्या बालासोरमधील एपीजे अब्दुल कलाम रेंजमध्ये सोमवारी ही चाचणी यशस्वी झाली. हे स्क्रॅमजेट (हाय स्पीड) इंजिनच्या मदतीने लाँच केले गेले. हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीननेही हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
या प्रकल्पाचे नेतृत्व डीआरडीओ प्रमुख जी सतीश रेड्डी आणि त्यांच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्र संघाने केले. सोमवारी सकाळी ११.०३ वाजता त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. चाचणी प्रक्रिया सुमारे पाच मिनिटे चालली. चाचणी करताना हे लाँच व्हिकल कॅबशन चेंबर, एअर इन्टेक सेवन आणि कंट्रोल यासारख्या मापदंडांवर योग्य असल्याचे आढळले. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आता येत्या पाच वर्षांत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करू शकेल.
हायपरसॉनिक क्षेपणास्त्रची वैशिष्टये :
* हायपरसॉनिक क्षेपणास्त्र एका सेकंदात २ किमीपर्यंत प्रहार करू शकतात.
* त्यांचा वेग ध्वनीच्या गतीपेक्षा सहापट जास्त आहे.
* भारतात तयार करण्यात आलेल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांमध्ये देशातच डिझाइन केलेल्या स्क्रॅमजेट प्रोपल्शन सिस्टम सज्ज असतील.