मुंबई : पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना कॉन्स्युलर ऍक्सेस मिळाल्यानंतर भारतीय दूतावासातील अधिकारी गौरव अहलुवालिया यांनी त्यांची भेट घेतली. ज्यानंतर या भेटीविषयी भारतीय परराष्ट्र मंत्र्यालयाकडून एका पत्रकाद्वारे भेटीचे तपशील प्रसिद्ध करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कुलभूषण जाधव हे त्यांच्याविषयी करण्यात आलेले खोटे दावे पाहता अतिशय तणावाखाली असल्याचं स्पष्ट होत होतं', असं प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं गेलं आहे. भारतीय परराष्ट्र मंत्र्यालयाकडून जाधव यांच्या आईलासुद्धा या भेटीविषयीची माहिती देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. भारत सरकार जाधव यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितरित्या मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न करत आहे, शिवाय ही एक जबाबदारी असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. 


दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनही या भेटीची माहिती देणारं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयानंतर कुलभूषण जाधव यांना कॉन्स्युलर ऍक्सेस देण्यात आल्याचं या पत्रकातून सांगण्यात आलं. ज्यामध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारताच्या दूतावासातील अधिकाऱ्यांनी कुलभूषण जाधव यांची जवळपास दोन तास भेट घेतली, असं म्हणण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून घेण्यात आलेल्या सशर्त अशा या भेटीनंतर पुढे जाधव यांच्या सुटकेच्या दृष्टीने नेमकी कशी आणि कोणती पावलं उचलली जाणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



२०१६ मध्ये कुलभूषण सुधीर जाधव यांनी पाकिस्तानच्या दक्षिण- पश्चिम भागात असणाऱ्या बलुचिस्तान येथून अटक करण्यात आली होती. जाधव हे भारतीय हेर असल्याचं म्हणत ते भारतीय नौदल आणि गुप्तचर यंत्रणा 'रॉ'साठी काम करत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यामुळे ही एकंदर परिस्थिती पाहता दोन्ही देशांमधील तणावाचं वातावरण आणखी वाढलं आहे.