देशाच्या विकासासाठी नुसत्या पुरोगामीपणापेक्षा करारी नेतृत्त्वाची अधिक गरज- जेटली
महाआघाडीचे नेतृत्त्व कामाचे नाही.
नवी दिल्ली: भारताच्या आर्थिक विकासासाठी भविष्यात पुरोगामी नव्हे तर ठाम निर्णय घेणाऱ्या नेतृत्त्वाची गरज असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केले. जेटली यांनी आपल्या ब्लॉगवरून देशाच्या भविष्यासाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व कशाप्रकारे महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले आहे की, देशाचा आर्थिक विकास आणि आकांक्षांच्या पूर्तीसाठी भारताला करारी नेतृत्त्वाची गरज आहे. त्यासाठी महाआघाडीचे नेतृत्त्व कामाचे नाही. कारण, देशाला बिनकामाच्या पुरोगामी नेतृत्त्वाची गरज नाही, असे जेटली यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपची राष्ट्रीय परिषद पार पडली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनीदेखील केंद्रात कणखर नेतृत्त्व असण्याची गरज बोलून दाखविली होती. जेटली यांनी मोदींच्या या विचारांचे समर्थन केले.
सध्याच्या घडीला देशातील औद्योगिक उत्पादनाने गेल्या १८ महिन्यांतील निचांकी पातळी गाठली आहे. मात्र, जेटली यांनी याचा प्रतिवाद करताना म्हटले की, वित्तीय शिस्तीच्यादृष्टीने बघायचे झाल्यास गेल्या पाच वर्षांचा कारभार पूर्वीपेक्षा उजवाच आहे. भारत ही सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मात्र, आम्ही ७ ते ७.५ टक्क्यांच्या विकासदरावर समाधानी नाही. आठ टक्क्यांची पातळी ओलांडायला भारतीय अर्थव्यवस्था आतूर आहे, असेही जेटली यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सांख्यिकी विभागाने (सीडीएस) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ७.२ टक्के इतका राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. शेती आणि उत्पादन क्षेत्रातील तेजीमुळे विकासदर वाढण्यास मदत होईल, असे अहवालात सांगण्यात आले होते.