Draupadi Murmu Oath Ceremony: देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज त्यांच्या पदाची शपथ ग्रहण करणार आहेत. सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी संसदेच्या सेंट्रल हॉल येथे हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्य न्यायाधीश एन.वी.रमण त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शपथविधी सोहळ्यादरम्यान 21 तोफांची सलामीही देण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनी शपथ ग्रहण केल्यानंतर त्या देशाला संबोधित करतील. द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. 


द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडण्याच्या पूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेसुद्धा शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


देशाचे उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकैय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, मंत्रीमंडळातील सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक धोरण प्रमुख, संसदेचे सदस्य आणि सैन्यदल अधिकारी या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. 


संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होणार आहेत. इथं त्यांना ‘इंटर-सर्विस गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात येणार आहे. तर, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संपूर्ण शिष्टाचारात सन्मानित करण्यात येणार आहे. 


काय आहे कार्यक्रमाची रुपरेषा? 
8.15 वाजता द्रौपदी मुर्मू त्यांच्या निवासस्थानाबून राजघाटच्या वाटेनं निघतील. 
8.30 वाजता द्रौपदी मुर्मू राजघाट येथे पोहोचतील. 
8.40 वाजता मुर्मू आपल्या निवासस्थानी परततील.
9.22 वाजता द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचतील.  
10 वाजता द्रौपदी मुर्मू संसद भवनाच्या गेट नंबर 5 येथे पोहोचतील. जिथे पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती त्यांचं स्वागत करतील.  
10.15 वाजता शपथविधी सोहळ्याची सुरुवात होणार आहे.  
10.23 वाजता द्रौपदी मुर्मू सेंट्रल हॉल मध्ये पहिलं संबोधनपर भाषण करतील. 
10.57 वाजता त्या राष्ट्रपती भवन येथे पोहोचतील.