जिना हाऊस आमचेच म्हणणाऱ्या पाकचा दावा भारताने फेटाळला
जिना हाऊस ही भारत सरकारची संपत्ती असून सरकार त्याच्या सौंदर्यीकरणाच्या प्रयत्नात
नवी दिल्ली : मुंबईतल्या मलबार हिल येथील जिना हाऊस आपल्या मालकीचे असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. हा दावा भारतातर्फे फेटाळण्यात आला आहे. मुंबईतील जिना हाऊस आमचे असून भारताद्वारे ते नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न आम्हाला मान्य नसल्याचे पाकिस्तानतर्फे सांगण्यात आले होते. विषय या संपत्तीचा असेल तर पाकिस्तानची यामध्ये कोणती बाजूच नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयलाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले. ही भारत सरकारची संपत्ती असून आम्ही त्याचे सौंदर्यीकरणाच्या प्रयत्नात आहोत असेही त्यांनी पुढे म्हटले.
असे आहे जिना हाऊस
जिना हाऊस फार पुर्वीपासूनच चर्चेचा विषय राहिले आहे. मुंबईतल्या मलबार हिल येथील या बंगल्याचे डिझाइन वास्तुशिल्प क्लाउड बाटली यांनी युरोपीय शैलीत तयार केले होते. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना हे 1930 दशकाच्या उत्तरार्धापर्यंत तिथे राहिले. या बंगल्याच्या पुढचा भाग हा समुद्राच्या दिशेने आहे. ही संपत्ती पाकिस्तानच्या दुतावासांना देण्यात यावी अशी मागणी काही वर्षांपासून पाकिस्तानतर्फे होताना दिसतेय.
आमचा हक्क
जिना हाऊसवर आमचा हक्क असून कोणी त्याचे हक्क घ्यावेत हे आम्हाला आवडणार नाही, असे पाकचे परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ता मोहम्मद फैजल यांनी माध्यमांना सांगितले होते. 'ही वास्तु पाकिस्तानची असल्याचे भारताने याआधीच मान्य केले आहे. आमच्याकडे तसे पुरावे आहेत', असेही ते म्हणाले होते. भारताने मात्र तात्काळ हा दावा फेटाळून लावला आहे.
जिना हाऊसच्या बदल्यात पाकिस्तान भारताला करतारपूर येथील जमीन देईल का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते 'मुळीच नाही' असे उत्तरले.
तोडण्याची मागणी
मुंबईत मलबार हिल इथलं जिना हाऊस गेल्यावर्षी मार्चमध्ये चर्चेत आले होते. जिना हाऊस तोडून तिथे सांस्कृतिक केंद्र उभारावे अशी मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. याबाबत त्यांनी संरक्षण मंत्र्यांनाही पत्र लिहले होते. हा बंगला सध्या केंद्र सरकारच्या ताब्यात असून देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि त्यावर लाखो रुपये खर्च होत असल्याचं लोढा यांनी म्हटले होते. शत्रू संपत्ती कायदा मंजूर झाल्यानंतर जिना यांचे वारसदार जिना हाऊसवर दावा करु शकत नसल्याचंही लोढा यांनी सांगितले होते.