Republic Day : ७१व्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी दिल्ली सज्ज
देशातील विविध ठिकाणी या दिवसाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : Republic Day India भारताच्या ७१व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि २६ जानेवारी हा दिवस साजरा करण्यासाठी म्हणून सारा देश सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही दिल्लीतील राजपथ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी आणि थरारक प्रात्यक्षिकांसाठी सज्ज झालं आहे. राजपथावर या दिवशी देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीची झलक एकाच वेळी पाहता येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राजपथावर होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण देशासह दिल्लीतही कड़ेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वप्रथम राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहिदांना आदरांजली वाहतील. ज्यानंतर ते राजपथाच्या दिशेने निघतील.
दिल्लीमध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या सुरक्षा दलांच्या सलामीचा स्वीकार करतील. ज्यानंतर देशात असणाऱ्या विविध राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या मंत्रालयांची झलक सादर केली जाणार आहे.
भारतीय संविधानाविषयीच्या रंजक गोष्टी वाचून व्हाल थक्क
प्रजासत्ताक दिनाच्या या औचित्याने विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शौर्य पुरस्कार मिळालेले विद्यार्थीही या संचलनाचा भाग असतील. दिल्ली आणि मुंबईसह विविध ठिकाणी असणाऱ्या काही महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वाढवण्यात आली आहे. शिवाय या इमारतींना खास रोषणाईसुद्धा करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार अतिदक्षतेचा इशारा म्हणून सुरक्षेच्या निकषांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.