नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारत रचणार `हा` विक्रम
२०२४ साली भारत चीनच्या पुढे जाईल.
नवी दिल्ली: नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला भारत जगामध्ये सर्वाधिक बाळांना जन्म देणारा देश ठरणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारील भारतात तब्बल ६९, ९४४ बाळांचा जन्म होईल. या दिवशी जगभरात जन्माला येणाऱ्या एकूण बालकांच्या तुलनेत हे प्रमाण १८ टक्के इतके आहे. त्यामुळे साहजिकच भारताच्या नावावर आगळावेगळा विक्रम नोंदवला जाईल. भारतापाठोपाठ चीन आणि नायजेरियामध्ये १ जानेवारीला अनुक्रमे ४४,९४० आणि २५,६८५ बाळांचा जन्म होईल. यानंतर पाकिस्तानमध्ये १५,११२, इंडोनेशियात १३,२५६, अमेरिकेत १०,०८६, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये १०,०५३ आणि बांगलादेशमध्ये ८,२४८ बाळांचा जन्म होईल, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले आहे.
भारताची सध्याची लोकसंख्या साधारणपणे १३० कोटी इतकी आहे. लोकसंख्येच्याबाबतीत जगात चीनपाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. मात्र, २०२४ साली भारत चीनच्या पुढे जाईल, असा संयुक्त राष्ट्रसंघाचा कयास आहे.
...म्हणून देशात वाढतेय 'प्री-मॅच्युअर' बालकांची संख्या
सध्याच्या घडीला जगात सर्वाधिक तरुण मनुष्यबळ असलेला देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. या रचनेमुळेही भारतातील लोकसंख्येचा दर वाढत असल्याचे निरीक्षण येल विद्यापीठातील अभ्यासकांनी नोंदविले आहे. भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय २७ इतके आहे. चीनमध्ये हेच वय ३८ इतके आहे. मात्र, बालकांचा मृत्यू होण्याचे भारतातील प्रमाण चीनच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. भारतात दरवर्षी जन्माला येणाऱ्या १००० बालकांपैकी ३८ बालकांचा पाच वर्षांपेक्षा कमी वयात मृत्यू होतो. चीनमध्ये हेच प्रमाण ११ इतके आहे. तसेच बालविवाह आणि वेळेआधी होणाऱ्या प्रसुतीमुळे मातांचे मृत्यू होण्याचे भारतातील प्रमाणही लक्षणीय आहे.