कडक सेल्यूट! वायुसेनेनं प्रवाहात अडकलेल्या तरुणाला असं केलं एअरलिफ्ट
भारतीय वायुसेनेच्या या कामगिरीचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.
नवी दिल्ली : देशातील अनेक भागात पूरामुळे हाहाकार माजला आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक जण यात दगावले असून मोठी वित्त हानी झाली आहे. या संकटाच्या काळात भारतीय वायु सेना लोकांच्या सेवेसाठी तत्पर असून हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरु आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करण्यात येत आहे. नुकतंच छत्तीसगढच्या खुंटाघाट धरणाजवळ पाण्याच्या वेगवान प्रवाहात अडकलेल्या एका तरुणाला एयरलिफ्ट करत सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी बिलासपूर प्रशासनाला, खुंटाघाट धरणाजवळ एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात अडकला असल्याची माहिती मिळाली होती. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहिलं असता परिस्थिती नियंत्रणात नसल्याच दिसलं. पाण्याच्या अतिशय प्रवाहामुळे, कोणत्याही परिस्थितीत त्या तरुणापर्यंत पोहचणं कठिण होतं.
त्यामुळे अधिकाऱ्यांकडून वायुसेनेला याबाबत माहिती देण्यात आली. या घटनाक्रमात तो तरुण पाण्याच्या जबरदस्त प्रवाहात, एका दगडावर स्वत:ला सावरत उभा होता. वायुसेनेचं हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहचल्यानंतर त्या तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. भारतीय वायुसेनेच्या या कामगिरीचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.
हवामानाच्या आव्हानात्मक परिस्थितीतही वायुसेनेकडून अतिशय सुरक्षित बचावकार्य करण्यात आलं असून व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश मिळालं आहे. सर्वांकडूनच वायुसेनेच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे.