नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने मंगळवारी पहाटे पीओकेमध्ये घुसून केलेल्या कारवाईत जैशचे अनेक कॅम्प उद्धवस्त झाले आहेत. जैश-ए-मोहम्‍मदचे प्रमुख तळ उद्धवस्त केल्यानंतर भारतीय हवाईदल आता हायअलर्टवर आहे. भारताने वायुदलाच्या सगळ्या एअर डिफेंस सिस्‍टमला आंतरराष्‍ट्रीय सीमाभागावर आणि एलओसीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. सोबतच भारतीय वायुदलाला आदेश देण्यात आले आहेत की, जर पाकिस्‍तानी हवाईदलाने कोणतीही कारवाई केली तर त्याला सडेतोड उत्तर द्या. न्यूज एजंसी एएनआयने ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीओकेमध्ये झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्‍मदचे अनेक तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तामधील वृत्तपत्र डॉनच्या वेबसाईटने ही माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय हवाईदलाने पीओकेमधील बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फराबादमध्ये सकाळी 3.30 वाजता ही कारवाई केली. या कारवाईत बालाकोटमधील जैशचं कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे.


जम्‍मू-काश्‍मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्य़ा हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण होतं. यानंतर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि एनएसए अजित डोवाल यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या कारवाईची संपूर्ण माहिती पंतप्रधान मोदींना दिली. भारतीय हवाईदलाच्या या कारवाईनंतर दुपारी संरक्षणमंत्री आणि हवाईदल पत्रकार परिषद घेणार आहेत.  



भारतीय वायुदलाच्या 12 मिराज-2000 या लढाऊ विमानांनी ही कारवाई केली. जैशच्या या ठिकाणांवर जवळपास 1000 किलोहून अधिक विस्फोटक टाकण्यात आले. ज्यामध्ये अनेक दहशतवादी कॅम्प उद्धवस्त झाले आहेत.