नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या पंजाबमधील अमृतसरमध्ये गुरूवारी रात्री लोकांना स्फोटाचा मोठा आवाज आल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. गुरूवारी रात्री उशिरा 1.30 वाजता मोठ्या स्फोटाचा आवाज झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले. या आवाजाने अमृतसर आणि इतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी कोणताही स्फोट न झाल्याचे सांगितले आहे. परंतु या स्फोटासारख्या आवाजाचे कारण आता समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या एजेन्सीने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री उशिरा भारतीय वायुसेनेकडून पंजाब आणि जम्मूमध्ये कोणत्याही अचानक आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लढाऊ विमानांच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीदरम्यान लढाऊ विमानांची अमृतसरसह इतर ठिकाणीही सुपरसोनिक स्पीडमध्ये उड्डाणे करण्यात आली. याच सुपरसोनिक स्पीडमुळे लोकांना स्फोटासारखे आवाज ऐकू आले. जगजीत सिंह वालिया यांनी लोकांना सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.



अमृतसरमधील काही स्थानिक नागरिकांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये या स्फोटासारख्या आवाजाने काही घरांच्या काचा फुटल्या असल्याचेही सांगितले. या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु पोलिसांनी स्फोटाची कोणतीही घटना झाली नसल्याने सांगितले आहे.