...म्हणून भारतीय सैन्यदलाचा गणवेश बदलणार
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे असतील काही महत्त्वाचे बदल
नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असणारे अधिकारी येत्या काळात नव्या गणवेशात दिसण्याची चिन्हे आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून सैन्यदलाच्या गणवेशामध्ये काही अमूलाग्र बदल करण्याचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे. हवामानातील बदलांचा सामना करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
'झी न्यूज'ला संरक्षण मंत्रालयाशी संलग्न असणाऱ्या काही अधिकृत सूत्रांकडून यासंदर्भातील माहिती मिळाली. भारताच्या विवध भागांमध्ये असणारी हवामानातील विविधता पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडीला सैन्यदलाच्या गणवेशाचं कापड हे टेरिकॉट धाग्यांपासून तयार करण्याकत येतं. पण, उष्ण आणि दमट हवामान असणाऱ्या प्रदेशातील सैन्यदल अधिकारी आणि जवानांच्या अनुशंगाने अशा प्रकारच्या कापडाचा गणवेश हा फारसा फायद्याचा ठरत नाही. ज्या कारणास्तव त्याऐवजी सूती कापडाचाही पर्याय अवलंबण्यात आला होता. पण, त्यांची देखभाल करणे कठिण असल्याचे कारण सैन्यदलाकडून देण्यात आले.
सैन्यदलाकडून समोर आलेल्या या एकंदर तक्रारी, हवामानाचा अंदाज आणि काही इतर महत्त्वाचे घटक लक्षात घेत येत्या काळात नवे गणवेश साकारण्यात येणार आहेत. ज्यामध्ये हवामानात होणाऱ्या बदलांपासून युद्धजन्य परिस्थितीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात येणार आहे.
हे असू शकतील गणवेशातील काही महत्त्वाचे बदल
* प्रत्येक अधिकाऱ्याच्या पदानुसार त्याच्या गणवेशावर असणारे अनेक बारकावेही या गणवेशात टीपण्यात येणार आहेत. सहसा खांद्यांवर असणाऱ्या 'सर्व्हिस स्ट्रीप्स', अर्थात सेवेविषयी/ अधिकाऱ्याच्या रँक किंवा पदाविषयी माहिती देण्याऱ्या खांद्यावर असणाऱ्या पट्ट्यांची जागा बदलून गणवेशावर असणाऱ्या बटणांपाशी त्यांची रचना करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
* गणवेशावर घालण्यात आलेले पट्टे हे आता गणवेशातच कसे घालता येतील याच्य़ा रचनेविषयी विचार करण्यात येत आहे. ज्यामुळे गणवेश परिधान करणे जवान/ अधिकाऱ्यांना अधिक सोयीचे आणि दिसण्यालाही अधिक प्रभावी ठरेल.
यापूर्वीही गणवेशात करण्यात आले होते बदल
यापूर्वी तीन वेळा भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात काही बदल करण्यात आले होते. पहिला बदल हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करण्यात आला होता. पाकिस्तानी सैन्यदलापासून भारतीय सैन्यदलाची वेगळी ओळख असण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला होता. दोन्ही देशांच्या सैन्यदलाच्या गणवेशात साधर्म्य असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले होते.
१९८० मध्ये भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात दुसऱ्यांदा बदल करण्यात आला. 'Disruptive Pattern (DP) battle dress', असे नाव त्याला देण्यात आले. हा गणवेश पॉलिस्टर प्रकारच्या कापडापासून साकारण्यात येत असे. जो फारसा सोयीचा नव्हता. २००५ मध्ये पुन्हा या गणवेशात बदल करण्याक आले. बीएसएफ आणि सीआरपीएफ या दोन्हींपासून थलसेनेचे वेगळेपण जपण्यासाठी हा बदल करण्यात आला होता.
तीन महत्त्वाच्या बदलांनंतर आता चौथ्या वेळेस सैन्यदल पुन्हा एकदा गणवेशात बदल करण्याच्या तयारीत आहे. हे बदल अतिशय महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी असतील. पण, आता नेमके किती आणि कोणते बदल केले जाणार हे मात्र अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.