भारतीय नागरिकांना `या` ठिकाणी मिळतयं २२ रुपयांनी स्वस्त पेट्रोल
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या १२ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. शुक्रवारीही पेट्रोल ३६ पैशांनी आणि डिझेल २२ पैशांनी महागलं.
नवी दिल्ली : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या १२ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. शुक्रवारीही पेट्रोल ३६ पैशांनी आणि डिझेल २२ पैशांनी महागलं. वाढत्या इंधनदरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, भारतातील एका राज्यातील नागरिकांना पेट्रोल-डिझेल तब्बल २० ते २२ रुपये स्वस्त मिळत आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
पेट्रोल-डिझेल २२ रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने येथील नागरिकांना इंधन दरवाढीचा कुठलाही त्रास होत नाहीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे.
पाहूयात कसं आहे हे शक्य?
दिल्लीपासून १,८९७ किमी दूर असलेल्या आसाम राज्यातील बक्सा जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांना इंधन दरवाढीचा कुठलाही त्रास होत नाहीये. कारण, या नागरिकांना दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या दरापेक्षा २० ते २२ रुपयांनी स्वस्त पेट्रोल-डिझेल मिळत आहे.
बक्साच्या सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांच्या गाड्या जवळपास दररोज भूतानच्या सॅमड्रप जोंगखार येथे पोहोचतात आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. नॅशनल हायवे १२७ ई च्या मार्गावरुन शेकडो नागरिक भूतानमध्ये जातात आणि त्या ठिकाणी पेट्रोल-डिझेल २० ते २२ रुपयांनी स्वस्त आहे. त्यामुळेच बक्साच्या सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांना इंधन दरवाढीमुळे कुठलाही त्रास होत नाहीये.
आसाममध्ये पेट्रोलचा दर ७६ रुपये प्रति लिटर आहे तर, भूटानमध्ये ५२ रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच बक्सापासून अर्धा किमी दूर गेल्यावर नागरिकांना स्वस्त पेट्रोल मिळतं कारण या ठिकाणी दुसरा देश आहे.
आश्चर्य वाटेल की...
तुम्हाला ऐकल्यावर आश्चर्य वाटेल की, भारतच भूतानला पेट्रोल पाठवतं. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भूटानमध्ये पेट्रोल-डिझेल सप्लाय करतात.