मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी आईला सुषमांची मदत
परराष्ट्र मंत्री सोशल मीडियाला सकारात्मकतेनं वापरत असल्याचे अनेक उदाहरण आत्तापर्यंत समोर आलीत. आता पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे सुषमा स्वराज यांनी एका आईला तिच्या मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत मिळवून दिली.
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सोशल मीडियाला सकारात्मकतेनं वापरत असल्याचे अनेक उदाहरण आत्तापर्यंत समोर आलीत. आता पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे सुषमा स्वराज यांनी एका आईला तिच्या मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत मिळवून दिली.
एक महिला आपल्या मुलासहीत ऑस्ट्रेलियाहून भारतात परतत होती. परंतु, कुआलांपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक तिचा मुलगा ग्लानी येऊन खाली पडला... आणि तिथंच त्याचा श्वास थांबला. आपल्या मुलाचा मृतदेह सोबत असलेल्या या शोकाकूल मातेला पुढे काय करायचं? हेच कळत नव्हतं.
मुलाच्या एका मित्रानं ही गोष्ट सोशल मीडिया ट्विटरद्वारे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहचवून मदतीची याचना केली.
थोड्याच वेळात सुषमा स्वराज यांनी या ट्विटला प्रतिसाद देत त्या आईला मदत उपलब्ध करून दिली. भारतीय उच्चायोगाच्या मदतीनं सरकारी खर्चानं मुलाचा मृतदेह भारतात दाखल झाला. 'अधिकारी आई आणि तिच्या मुलाच्या मृतदेहासह मलेशियाहून चेन्नईला येत आहेत.... शोकाकूळ कुटुंबियांसाठी माझ्या संवेदना' असं ट्विटही त्यांनी केलं.