नवी दिल्ली : जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम गेल्या महिन्यात भारताच्या परदेशी व्यापारावरही झाला आहे. देशाच्या आयात आणि निर्यात दोन्हींमध्येही नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. निर्यातीत काहीशी घसरण झाली. तर आयातीमध्ये १२ टक्क्यांहून अधिक घसरणीची नोंद करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात गेल्या वर्षी याच महिन्यातील २६.०७ अब्ज डॉलरवरुन घसरुन २५.९८ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात निर्यात कमी झाली. ऑक्टोबर महिन्यात भारताने २६.३८ अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तूंची निर्यात केली होती.


नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलियम आणि रत्नभूषण या व्यतिरिक्त इतर वस्तूंची निर्यात गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत ४.०८ टक्क्यांनी वाढून १९.३१ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या वस्तूंची निर्यात १८.५५ अब्ज डॉलर इतकी झाली होती.


अधिकृत आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये आयात मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १२.७१ टक्क्यांनी घसरून ३८.११ अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयात ४३.६६ अब्ज डॉलर्स इतकी होती.


यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तेलाची आयात ११.०६ अब्ज डॉलर इतकी झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात १३.५२ डॉलर किंमतीच्या तेलाची आयात करण्यात आली होती. मागील वर्षाच्या तुलनेत तेल आयातीतील डॉलरचे मूल्य १८.१७ टक्क्यांनी कमी झालं आहे.