शिमला: भारत ही जागतिक मंदीच्या विळख्यातून बाहेर पडणारी जगातील पहिली अर्थव्यवस्था असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. ते शुक्रवारी शिमला येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी देशातील उद्योजकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत भारतामध्ये जागतिक मंदीचे तात्पुरते परिणाम आपल्याला दिसत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामन आणि अनुराग ठाकूर यांनी अहोरात्र मेहनत करून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ठोस असे धोरण तयार केले आहे. त्यामुळे लवकरच आपण या सगळ्यातून बाहेर पडू. किंबहुना भारत ही जागतिक मंदीतून बाहेर पडणारी पहिली अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था गंभीर; लहानसहान उपायांनी काहीही होणार नाही'


गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर सातत्याने घसरत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदराने ४.५ टक्क्यांची निच्चांकी पातळी गाठली होती. याशिवाय, देशातील बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. वाहननिर्मितीसह (ऑटोमोबाईल) अनेक क्षेत्रांमध्ये सुस्तीचे वातावरण आहे. त्यामुळे मोदी सरकारवर चहुबाजूंनी टीका सुरु आहे.



मध्यंतरी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी करातील कपात आणि परकीय गुंतवणुकीवरील निर्बंध मागे घेण्यासारख्या तात्पुरत्या उपाययोजना जाहीर केल्या होत्या. मात्र, अर्थव्यवस्थेवर त्याचा अपेक्षित परिणाम झाला नव्हता. यानंतर निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्था केवळ सुस्तावली आहे, देशात मंदी नाही, असा युक्तिवाद केला होता. अर्थव्यवस्थेच्या चक्रात ठराविक काळानंतर अशी परिस्थिती येते, असेही काही भाजप नेत्यांनी म्हटले होते. मात्र, विरोधकांनी सातत्याने हा मुद्दा लावून धरत मोदी सरकारची कोंडी केली आहे.