Budget 2019: मनोरंजन क्षेत्रासाठीही मोदी सरकारकडून खुशखबर
मनोरंजन क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी भारतीय चित्रपट निर्मात्यांना एकल खिडकी व्यवस्थेअंतर्गत सुविधा देण्यात आली आहे
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात सरकारने शेतकरी, कामगार, नोकरदार वर्गासह चित्रपट निर्मात्यांनाही खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पीयूष गोयल यांनी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी एकल खिडकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. म्हणजेच चित्रपट निर्मात्यांना सर्व परवानग्या घेण्यासाठी एका खिडकीची सुविधा देण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना पीयूष गोयल यांनी मनोरंजन क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी भारतीय चित्रपट निर्मात्यांना एकल खिडकी व्यवस्थेअंतर्गत सुविधा देण्यात येत असल्याचं सांगितलं. आधी ही सुविधा केवळ विदेशी चित्रपट निर्मात्यांना देण्यात येत होती.
कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी सिनेमॅटोग्राफी कायद्यांतर्गत कॅमेरा रेकॉर्डिंग प्रतिरोधक तरतूद केली जाणार असल्याचं गोयल यांनी सांगितले.
मनोरंजन क्षेत्र सर्वात मोठे रोजगार निर्मितीचे क्षेत्र आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर सर्वच भाषांतील निर्मात्यांना मोठा फायदा होणार आहे. पीडब्लूसी आणि एसोचॅम या दोन संस्थांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग २०२२ पर्यंत ३.७३ लाख करोड रूपयांवर पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.