नौदलातील गौरवशाली प्रवास थांबणार! अलविदा INS निशंक, INS अक्षय
३ जूनला सूर्य अस्ताला जाताना मुंबईत नौदलाच्या तळावर दोन शूरवीर युद्धनौका निवृत्त होतील
अमित भिडे, झी २४ तास : ३ जूनला सूर्य अस्ताला जाताना मुंबईत नौदलाच्या तळावर दोन शूरवीर युद्धनौका निवृत्त होतील. आयएनएस निशंक (INS Nishank ) आणि आयएनएस अक्षय ( INS Akshay ) या युद्धनौका आपला ३२ वर्षांचा नौदलातला गौरवशाली प्रवास थांबवतील. (Indian Navy) आयएनएस निशंक ही एक वीर क्लास कॉरवेट. कॉरवेट म्हणजे फ्रिगेटपेक्षाही छोट्या आकाराची युद्धनौका. तिचा स्पीड तुलनेत जास्त असतो. नौदलात गरजेनुसार डिस्ट्रॉयर्स, फ्रिगेट्स, कॉरेवट, एअरक्राफ्ट कॅरियर्स अशा विविध युद्धनौका वापरल्या जातात. निशंक आणि अक्षय या दोन्ही युद्धनौका ( Indian Warships ) तत्कालीन यूएसएसआरमधल्या, सध्या जॉर्जियातल्या, पोटी शिपयार्डमध्ये तयार झाल्या. अतिशय थंड वातावरणात तयार झालेल्या या युद्धनौका आता समशितोष्ण वातावरणात मुंबईत नौदलातल्या सेवेतून पूर्णविराम घेतील. अर्थात तेव्हा मुंबईत उपस्थितांसाठी हा क्षण भावनिक असेल यात शंकाच नाही.
किलर स्क्वॉड्रनचा हिस्सा
INS Nishank ही युद्धनौका १९७१ च्या युद्धात भीमपराक्रम गाजवणा-या किलर स्क्वॉड्रनचा हिस्सा होती. १९७१ च्या युद्धात किलर स्क्वॉड्रन ही सर्वात नवी म्हणजेच सर्वात तरूण म्हणावी अशी स्क्वॉड्रन होती. ४ आणि ५ डिसेंबरच्या रात्री किलर स्क्वॉड्रनच्या निर्घट, निपत आणि वीर या युद्धनौकांनी कराची बंदरावर जोरदार हल्ला चढवला. या मिसाईल कॉरवेट्सना बेफाम मा-यात कराची बंदर जाळून टाकलं एवढंच नाही. पाकिस्तानच्या मुआफीज आणि खैबर या दोन युद्धनौकाही बुडवल्या. पाकिस्तानी नौदलाचं कंबरडं मोडण्याचं काम या किलर स्क्वॉड्रनने केलं होतं. निशंक ही युद्धनौका पश्चिम आणि पूर्व तटावर कामगिरी बजावलेली युद्धनौका आहे. निवृत्तीनंतर युद्धनौका इथेच थांबत नाहीये. निवृत्तीनंतर निशंक ही युद्धनौका वॉर म्युझियममध्ये रूपांतरीत होईल. तिचं ठिकाण अजून ठरलेलं नाही.
२३ व्या पेट्रोलिंग स्क्वॉड्रनचा हिस्सा
आयएनएस अक्षय ही युद्धनौका २३ व्या पेट्रोलिंग स्क्वॉड्रनचा हिस्सा आहे. प्रामुख्याने पाणबुडीविरोधी युद्ध आणि किनारी संरक्षण ही दोन महत्त्वाची कर्तव्य तिने पार पाडली आहेत. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान ऑपरेशन तलवार, २००१ मध्ये ऑपरेशन पराक्रम, २०१७ मध्ये ऊरी हल्ल्यानंतर कोणत्याही आक्रमक कारवाईला तोंड देण्यासाठी या दोन्ही युद्धनौका तैनात होत्या.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात आपल्यावर आलेली प्रत्येक जबाबदारी मोठ्या धैर्याने आणि शूरवीरपणे या युद्धनौकांनी चोख पार पाडलीय. या युद्धनौकांवर अनेक नौसैनिकांनी अधिका-यांनी आपली सेवा बजावली आहे. या प्रत्येकाला, देशाला या युद्धनौकांचा अभिमान आहे.
३ जूनला सूर्य अस्ताला जाताना बिगुलाच्या स्वरांच्या साक्षीने या युद्धनौकांना निवृत्त केलं जाईल. युद्धनौकेत आत्मा असतो. ती स्वतः एक कर्तव्यदक्ष सैनिक असते असं मानलं जातं. त्यांना सन्मानाने अखेरचा सॅल्यूट सगळा देश देईल.
Indian naval services INS Akshay and INS Nishank decommissioned