Ugly Girls Can Be Married Off: देशभरात हुंडा पद्धतीवर कायद्यानं बंदी असली तरी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात हुंडापद्धतीचं समर्थन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  नर्सिगच्या 'टेक्सबुक ऑफ सोशिऑलॉजी फॉर नर्सेस' या पाठ्यपुस्तकात हुंड्याचे फायदे या शिर्षकाखाली वादग्रस्त विधानं करण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुरुप मुलींचे विवाह हुंड्यामुळे होऊ शकतात. तसंच जास्त शिकलेल्या मुलींना कमी हुंडा द्यावा लागतो, असंही या पुस्तकातून नमुद करण्यात आलं आहे. शिवसेना राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदींनी यांनी पुस्तकातील एक पान सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलंय. अशी पाठ्यपुस्तकं अभ्यासक्रमातून काढून टाकण्याची मागणी त्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. 


हुंडा पद्धतीचे 'फायदे आणि वैशिष्ट्यांचं' वर्णन करणाऱ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि त्यासोबत लिहिलेली माहिती पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पुस्तकाचा भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या (Indian Nursing Council) अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. 


राज्यसभा खासदाराने शेअर केला फोटो
'हुंड्याची पात्रता' असं शिर्षक असलेला धडा टीके इंद्राणी यांनी लिहिला आहे. शिवसेना नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या धड्याचं एक पान ट्विटरवर शेअर केलं आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अभ्यासक्रमातून अशी पुस्तकं काढून टाकण्याची विनंती केली असून अभ्यासक्रमात असे विषय असणे ही 'शरमेची' बाब असल्याचे म्हटलं आहे. 


हुंड्याचे असे फायदे?
फर्निचर, रेफ्रिजरेटर आणि वाहनांसारख्या उपकरणांसह 'नवीन घर उभारण्यासाठी हुंडा उपयुक्त ठरतो' असं वादग्रस्त लिखाण या पुस्तकात आहे.  ज्या देशात अनेक वर्षांपासून हुंडा घेणं बेकायदेशीर आहे त्याच देशातील अभ्यासक्रमात हुंडा किती फायदेशीर आहे हे शिकवलं जात आहे. आपल्या समाजात हुंड्याच्या मागणीसाठी महिलांचा मानसिक छळ, शारीरिक छळ, हत्या आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या बातम्या येत असतात.


या पुस्तकात लेखक म्हणतो की हुंडा पद्धतीचा एक 'अप्रत्यक्ष फायदा' असा आहे की पालकांनी आपल्या मुलींना कमी हुंडा द्यावा यासाठी शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. पानाचा शेवटचा मुद्दा असा आहे की हुंडा पद्धतीमुळे 'कुरूप दिसणार्‍या मुलींना' लग्न होण्यास मदत होते.