शपथविधीवेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हातात वेद असावेत; भाजपच्या मंत्र्याची मागणी
वेदांचे अध्ययन केल्यास दहशतवाद संपेल.
नवी दिल्ली: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताना संबंधित व्यक्तीच्या हातात बायबल असते. त्याचप्रमाणे भारतातही राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्र्यांनी वेद हातात घेऊन आपल्या पदाची शपथ घेतली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री सत्यापल सिंह यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आर्य महासंमेलनाच्या व्यासपीठावर बोलत होते.
भारतातील राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या शपथग्रहण सोहळ्यावेळी त्यांच्या हातात वेद असावेत, हे माझे स्वप्न आहे. देशापुढे सध्या दहशतवाद आणि गुन्हेगारी यासारख्या समस्या आहेत. या सर्वांचे निदान वेदांमध्ये आहे. ऋषीमुनींनी लिहलेल्या या ज्ञानातूनच आपल्याला या समस्यांवरचा मार्ग सापडेल. या देशाला पुन्हा गौरव प्राप्त करून द्यायचा असेल तर वेदांकडे वळणे क्रमप्राप्त आहे, असेही सत्यपाल सिंह यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील उपस्थि होते. यावेळी त्यांनी दिवाळीच्या काळात फटाक्यांवर घालण्यात आलेल्या बंदीचे समर्थन केले. थंडीचा ऋतू सुरु झाला आहे. या काळात प्रदूषण वाढल्यास दिल्लीकरांना श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पर्यावरणाला हानी न पोहचवता शांतता आणि सौहार्दाने सण साजरे करावेत, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.