ट्रेनमधली वीज गेली, संतातलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.. Video व्हायरल
प्रवाशांना घेऊन ठरललेल्या वेळेनुसार ट्रेन रवाना झाली. पण विज खंडीत झाल्याने ट्रेन पुढच्या रेल्वे स्थानकावर थांबली आणि तब्बल दोन तास झाल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला राग टीसीवर काढला. टीसीला जाब विचारत संतप्त प्रवाशांनी टीसीला ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं.
Indian Railway : भारतीय रेल्वेचा प्रवास हा केवळ एक प्रवास नाही तर आयुष्यभराचा अनुभव असतो. हा अनुभव आयुष्यभर आपल्यासोबत जोडला जातो. हा अनुभव कधी सुखद असतो तर कधी वाईट असतो. दिल्लीतल्या आनंदविहारवरुन उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट ट्रेनमधल्या (Suhaildev Superfast Express) प्रवाशांसाठी हा अनुभव असाच कायमचा लक्षात राहाणारा ठरला. दिल्लीतल्या (Delhi) आनंद विहार टर्मिनलवरुन सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस निर्धारित वेळेत उत्तरप्रदेशमधल्या गाझीपूरसाठी रवाना झाली. पण थोडं अतंर पार केल्यानंतर ट्रेनमधली बत्तीच गुल (Power Cut) झाली. वीज गेल्यामुळे ट्रेनमधला एसीही बंद पडला.
एसी बंद झाल्याने ट्रेनमधील लहान मुलं, महिला आणि वृद्धांना त्रास जाणवू लागला. गर्मीमुळे प्रवाशांची वाईट अवस्था झाली. प्रवासी संतप्त झाले. प्रवाशांनी आपला सगळा राग ट्रेनमधल्या टीसीवर काढला. तब्बल दोन तास सुहेलदेव एक्स्प्रेस एकाच जागेवर उभी होती. त्यामुळे प्रवाशांचा संतापाचा कडेलोट झाला. प्रवाशांनी याचा जाब टीसीला विचारायला सुरुवात केली. टीसीने तांत्रिक कारणामुळे वीज गेल्याचं सांगितलं. पण संतप्त प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही प्रवाशांनी टीसीची कॉलर पकडून त्याला थेट ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं.
प्रकरण वाढल्याने याची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचं एक पथक सुहेलदेव एक्स्प्रेसमध्ये दाखल झालं. पण यानंतरही प्रवाशांचा उद्वेग कायम होता. अखेर रेल्वे अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी युद्ध पातळीवर तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे आदेश दिले. पण या सर्व गोंधळात बराच वेळ केला. तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर वीज आली आणि ट्रेन रवाना करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुहेलदेव सुपरफास्ट ट्रेनमधला हा प्रकार काही प्रवाशांनी ट्विटरवर शेअर केला आहे. वीजेचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी तब्बल 2 तासाहून अधिक वेळ लागल्याचं प्रवाशांनी म्हटलं आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितनुसार सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस तब्बल पाच तास उशीरा धावत होती.