Indian Railway: देशातील कोट्यवधी लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात. दूरचे अंतर कमी वेळात आणि कमी खर्चात सुरक्षितपणे पार करण्यासाठी ट्रेनचा पर्याय उत्तम मानला जातो. ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे सांगण्यासारखे रोज नवे किस्से असतात. कारण वेगवेगळ्या प्रदेशातील, भाषेतील माणसे एकाच डब्यातून प्रवास करत असतात. मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये अशीच एक घटना घडली. ज्याची चर्चा देशभरात होत आहे. जिथे नवरदेवाला मंडपात पोहोचवण्यासाठी ट्रेन थांबवली गेली. कुठे घडला हा प्रकार? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून येणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडासाठी रेल्वेने हावडा स्टेशनवर 'कनेक्टिंग' ट्रेन काही मिनिटांसाठी थांबवली होती. हे वऱ्हाड गुवाहाटीमध्ये वेळेवर पोहोचू शकेल यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर लग्नाच्या वऱ्हाडाने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. पूर्व रेल्वेने एक्सवर ही माहिती दिली आहे.


सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लग्नाच्या वऱ्हाड्यांकडून विनंती 



शुक्रवारी ही घटना घडली. मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेसमधून 34 वऱ्हाडी प्रवास करत होते. यापैकी नवरदेवाचे नातेवाईक असलेल्या चंद्रशेखर वाघ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेल्वे अधिकाऱ्यांकडे विनंती केली होती. या ट्रेनची हावडा येथे पोहोचण्याची नियोजित वेळ दुपारी 1 वाजून 05 मिनिटे अशी आहे. पण ती उशीरा धावत आहे. आम्हाला हावडाहून आसामसाठी 4 वाजता सुटणारी सराईघाट एक्स्प्रेस चुकण्याची भीती असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.


गीतांजली एक्सप्रेस हावडा येथे 4 वाजून 8 मिनिटांनी पोहोचली


पूर्व रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला यासंदर्भात माहिती दिली. चंद्रशेखर वाघ यांच्या आवाहनानंतर हावडा विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांना भारतीय रेल्वेच्या उच्च अधिकार्यांकडून तातडीचा ​​संदेश आला. रेल्वे अधिकाऱ्यांनी सराईघाट एक्स्प्रेस थांबवून ठेवली. गीतांजली एक्स्प्रेस वेगाने हावडा गाठेल याची खात्री केली. गीतांजली एक्सप्रेस हावडा येथे संध्याकाळी 4 वाजून 8 मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी लग्नाच्या वऱ्हाडाला नवीन कॉम्प्लेक्समधील प्लॅटफॉर्म क्रमांक-24 वरून सराईघाट एक्सप्रेस उभी असलेल्या जुन्या कॉम्प्लेक्समधील प्लॅटफॉर्म क्रमांक-9 पर्यंत बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये बसवून पोहोचवले.


नवरदेवाला लग्नाला घेऊन जाण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलली


लग्नाचे वऱ्हाड ट्रेनमध्ये चढल्यानंतर सराईघाट एक्स्प्रेस काही मिनिटांच्या विलंबाने गुवाहाटीकडे रवाना करण्यात आली.'आम्हाला दोन्ही गाड्यांमधील सर्व प्रवाशांचे सहकार्य मिळाले. तसेच रेल्वे मंत्री, मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक, डीआरएम आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी लग्नात नवरदेव पोहोचेल याची खात्री करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलली. अशा सेवा देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे,' असे ते म्हणाले. पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली.