वंदे भारत चालवण्यासाठी चक्क लोको पायलट भिडले, रेल्वे स्थानकावरच एकमेकांचे कपडे फाडले... Video व्हायरल
Vande Bharat : वंदे भारत कोण चालवणार यावरुन चक्क दोन लोको पायलटमध्ये जोरदार राडा झाला. रेल्वे स्थानकावरच दोघांनी एकमेकांचे कपडे फाडले. यात दोघांच्या बाजूने काही रेल्वे कर्मचारीही सहभागी झाले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Vande Bharat : ट्रेनमध्ये बसणाच्या जागेवरुन प्रवाशांमध्ये हाणामारीच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. कधी बसण्यावरुन तर कधी धक्का लागल्यावरुन प्रवाशी एकमेकांवर तुटून पडतात. पण तुम्ही कधी ट्रेन कोण चालवणार यावरुन दोन लोको-पायलट (Loco Pilot) भिडल्याचं ऐकलं आहे का? प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. राजस्थानच्या उदयपूरहून आगरादरम्यान सुरु झालेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) चालवण्यावरुन दोन लोको पायलट आपापसात भिडले. दोन्ही लोका पायलट, त्यांचे सह चालक आणि गार्ड असे सर्वच एकमेकांवर तुटून पडले. ही हाणामारी इतकी जोरदार होती की एकमेकांचे कपडेही फाडण्यात आले. भर रेल्वे स्थानकावरच हा सर्व प्रकार सुरु होता. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दोन लोको पायलट भिडले
नव्याने सुरु झालेली वंदे भारत एक्स्प्रेस कोण चालवणार यावरुन दोन लोको पायलटमध्ये भांडण सुरु झालं. याचं पर्यावसन हाणामारीत झालं. या हाणामारीत वंदे भारत एक्स्प्रेसच्या गार्ड रुमच्या दरवाजाचं लॉक आणि काचाही फोडण्यात आल्या. हे प्रकरण आता रेल्व बोर्डापर्यंत पोहोचलं आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेल्वे बोर्डानेही यावर अद्याप काहीच तोडगा काढलेला नाही. या सर्व राड्यामुळे उदयपूर ते आगरा आणि आगरा ते उदयपूर प्रवासाला मोठा विलंब झाला.
दोन रेल्वे विभागातील वाद
वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालवण्यावरुन कोटा रेल्वे विभाग आणि आगरा रेल्वे विभाग यांच्यातला हा वाद जुनाच आहे. याआधी 2 सप्टेंबरला वंदे भारत एक्स्प्रेस कोटाहून गंगापूरला पोहोचली. त्यावेळी आगरा रेल्वे विभागातल्या लोको पायलटला परतीच्या प्रवासात ट्रेन चालवायची होती. पण गंगापूर सिटी विभागातल्या चालकाने त्याला विरोध केला. यानंतर दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. वंदे भारत कोटा रेल्वे विभागाच्या हद्दीतून जाताना ट्रेनचा ताबा कोटा रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावा अशी त्यांची मागणी आहे. तर ट्रेन आगराच्या दिशेने जात असल्यासं आगरा रेल्वे विभागातील कर्मचारी ट्रेन चालवतील असा आगरा विभागाचा आग्रह आहे.
नव्या ट्रेनमुळे प्रमोशन
रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी एखादी नवी ट्रेन लोको पायलटला चालवायला मिळते त्यावेळी त्याचं प्रमोशन पक्क मानलं जातं. त्यामुळे नवी ट्रेन चालवायला मिळावी यासाठी वाद होतात. पण उदयपूरमध्ये वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. कर्मचाऱ्यांच्या या वादात वंदे भारत एक्स्प्रेसचंही नुकसान झालंय. शिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वादाचा मनस्ताप प्रवाशांनाही सहन करावा लागला.