१८० किमी वेगाने धावणार रेल्वे, भारतीय रेल्वेने तयार केले हायस्पीड इंजिन
आता यापुढे रेल्वेचा वेग ताशी १८० किमी असणार आहे.
मुंबई : भारतीय रेल्वेने मोठी कमाल करुन दाखवली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात स्वत: तयार केलेले हायस्पीड इंजिन रुळावरुन लवकरच धावणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी ट्विट करत व्हिडिओ अपलोड केला आहे. या हायस्पीड इंजिनमुळे रेल्वेचा वेग ताशी १८० किमी असणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचे अंतर सहज आणि लवकर कापता येणार आहे.
पश्चिम बंगालमधील चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (सीएलडब्ल्यू) येथे भारतीय रेल्वेने हायस्पीड लोकोमोटिव्ह (रेल्वे इंजिन) तयार केले आहे. जे जास्तीत जास्त १८० किमी प्रतितास वेगाने धावू शकते, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी ही माहिती दिली. ताशी १८० किमी वेगाने धावणारे रेल्वे इंजिन तयार करण्यात भारताला यश आले आहे. कोलकाताजवळच्या चित्तरंजन इंजिन कारखान्यात हे इंजिन बनवण्यात आले आहे. नुकतीच या इंजिनाची यशस्वी चाचणी पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या "मेक इन इंडिया" उपक्रमांतर्गत नवीन लोकोमोटिव्ह तयार करण्यात आल्याचेही पीयूष गोयल यांनी नमूद केले. गोयल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे याबाबतचे ट्विट केले आहे. या नव्या हायस्पीड इंजिनामुळे रेल्वे गाड्यांना उत्तम वेग मिळेल. केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या ट्विटसह एक व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. यात ही रेल्वे अति वेगात धावत आहे.