मुंबई : IRCTC Booking Update: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आतापर्यंत तुम्ही एका IRCTC अकाऊंटवरुन एका महिन्यात 6 तिकिटे बुक करु शकता, आणखी तिकिटे बुक करण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते आधारशी लिंक करावे लागेल. पण, आता तिकीट बुकिंगची पद्धत बदलणार आहे. आता नवीन नियमानुसार, फक्त एका तिकिटासाठी, तुम्हाला आधार तपशील द्यावा लागेल.


IRCTC कडून तिकीट बुकिंगची नवीन प्रणाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एकच रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करायला जाल, तेव्हा IRCTC तुम्हाला पॅन, आधार किंवा पासपोर्टची माहिती विचारु शकते. खरं तर, IRCTC रेल्वे तिकीट दलालांना तिकीट बुकिंगच्या व्यवस्थेतून वगळण्यासाठी ही पावले उचलणार आहे. IRCTC नवीन प्रणालीवर वेगाने काम करत आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे आधार-पॅन लिंक करावे लागेल. IRCTC वेबसाइट किंवा अॅपद्वारे रेल्वे तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुम्हाला आधार, पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक टाकावा लागेल.


रेल्वे तिकीट पॅन, आधारशी जोडले जाईल


रेल्वे संरक्षण दलाचे (आरपीएफ) महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले की, रेल्वे ओळखपत्र दस्तऐवजांना आयआरसीटीसीशी जोडण्याच्या योजनेवर काम करत आहे. ते म्हणाले की यापूर्वी फसवणुकीविरोधातील कारवाई मानवी बुद्धिमत्तेवर आधारित होती, परंतु त्याचा परिणाम पुरेसा नव्हता. शेवटी आम्ही तिकीटासाठी लॉग इन करताना पॅन, आधार किंवा इतर ओळख दस्तऐवजांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे आम्ही तिकीट बुकिंगची फसवणूक थांबवू शकतो.


लवकरच नवी प्रणाली सुरु होईल


अरुण कुमार यांनी सांगितले की, प्रथम आपल्याला नेटवर्क तयार करण्याची गरज आहे. आधार प्राधिकरणासोबत आमचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लागताच. त्याची अंमलबजावणी केल्यानंतर आम्ही त्याचा वापर सुरु करु. अरुण कुमार यांनी माहिती दिली की दलालांवर कारवाई 2019 मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सुरू झाली होती, तेव्हापासून 14,257 दलालांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 28.34 कोटींची बनावट तिकिटे पकडली गेली आहेत.


अरुण कुमार म्हणाले की, रेल्वे सुरक्षा अॅप विकसित केले गेले आहे जिथे या बाबींशी संबंधित तक्रारी करता येतील. ते म्हणाले की 6049 स्थानकांवर आणि सर्व प्रवासी ट्रेनचे डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आहे.