रेल्वेप्रवासातील खाद्यपदार्थ स्वस्त, दिवाळीपूर्वी सुरु होणार `ही` सुविधा
प्रवाशांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींवर `ही` सुविधा उत्तम तोडगा ठरणार का?
मुंबई : कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टीने आता भारतीय रेल्वेकडूनही काही महत्त्वाची पावलं उचलली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी स्थानकांवर किंवा मग ट्रेनमध्ये येणाऱ्या फेरीवाल्यांकडून, विक्रेत्यांकड़ून विविध खाद्यपदार्थांची खरेदी करतात. ज्या बदल्यात ते फेरीवाल्यांना अमुक एका उत्पादनाची रोख रक्कम देतात.
हाच व्यवहार कॅशलेस करण्यासाठी म्हणून आता रेल्वेमध्ये असणाऱ्या विक्रेत्यांना रेल्वे बोर्ड 'पीओएस' म्हणजेच 'पॉईंट ऑफ सेल' सुविधा असणारं उपकरण देण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे.
दिवाळीच्या आधी म्हणजेच एक नोव्हेंबरपूर्वीच शताब्दी, दुरंतो आणि राजधानी अशा लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये या सुविधेची सुरुवात होणार आहे.
रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून एखादी वस्तू विकत घेतली असता अनेकदा त्यांना पाकिटावर छापलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. पण, 'पीओएस' उपकरणामुळे आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून उत्पादनाचं मुळ शुल्कच त्यांच्याकडून आकारलं जाणार आहे.
प्रवाशांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारी आणि विक्रेत्यांकडून आकारलं जाणारं जादा शुल्क या साऱ्या गोष्टी नजरेत ठेवत पीओएसचा पर्याय राबवण्यात आल्याचं कळत आहे.
आतापर्यंत जवळपास १८५ ट्रेनमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्याचंही कळत आहे. येत्या काळात विक्रेत्याने या सुविधेअंतर्गत उत्पादनाचं बिल देण्यास नकार दिल्यास खाद्यपदार्थ मोफत मिळण्याचा पर्यायही उपलब्ध असल्याचं कळत आहे.
तेव्हा आता या सुविधेमुळे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांकडून आकारलं जाणारं जादा शुल्क आणि त्यामुळे वारंवार येणाऱ्या तक्रारींवर ही सुविधा म्हणजे उत्तम तोडगा ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.