चंदीगड ते लेह... भारत बनवणार सर्वात उंचीवरचा रेल्वेमार्ग!
डोंगररांगांत सुरुंगाच्या साहाय्यानं ही २४४ किलोमीटर रेल्वेमार्ग
नवी दिल्ली : लवकरच रेल्वेनं चंदीगडहून लेहला पोहचणं शक्य होणार आहे. उत्तर रेल्वे विभागानं समुद्रसपाटीपासून ५३७० मीटर उंचीवर जगातील सर्वात मोठा रेल्वेमार्ग बनवण्याचं काम सुरू केलंय. हा रेल्वेमार्ग खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही रेल्वे लाईन आऊटर हिमालयन, ग्रेट हिमालयन, शिवालिक हिल्स या तीन पर्वतीय श्रृंखलांहून धौलाधार, पीरपंजाल, लेह, कांगडा, बडा लाचा, पींग पार्वती यांसारख्या उंचच उंच टेकड्यांहून जाणार आहे.
सध्या रेल्वेलाईन केवळ भानूपाली रेल्वेस्टेशनपर्यंत आहे... हे स्टेशन लेहपासून जवळपास ४७५ किलोमीटरवर आहे. डोंगररांगांत सुरुंगाच्या साहाय्यानं ही २४४ किलोमीटर रेल्वेमार्ग बनवण्यात येणार आहे.
भानुपालीहून लेहपर्यंत रेल्वेमार्ग बनवण्यासाठी तीन सर्व्हे करण्यात येणार आहेत. यातील एक सर्व्हे पूर्ण झालाय, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळतेय.
सर्व्हे करणाऱ्या 'राईटस्' या एजन्सीनुसार, या मार्गासाठी जवळपास ५०,००० करोड रुपयांचा खर्च येणार आहे. या रेल्वेमार्गावर ३० स्टेशन, छोटे-मोठे १२४ ब्रीज आणि ७४ सुरुंग बनविण्यात येणार आहे. यातील एक सुरुंग तब्बल २७ किलोमीटर लांब असेल. जगात कोणत्याही रेल्वेमार्गावर इतकी लांब सुरुंग सध्या अस्तित्वात नाही.
लेहमध्ये ज्या ठिकाणी रेल्वेमार्ग संपेल तिथे यार्ड बनवण्यात येईल. या यार्डचं नाव 'फेयार्ड' असेल. या संपूर्ण रेल्वेमार्गावर 'ब्रॉडगेज' रुळ असतील. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वेंना तीन इंजिन असणार आहेत. यातील दोन इंजिन पुढे तर एक इंजिन पाठीमागून ट्रेनला धक्का देण्यासाठी असेल. त्यामुळे उंचावरूनही ही ट्रेन सहजच प्रवास करू शकेल.