मुंबई :भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी मिळणार आहे. रेल्वेची गस्ती यंत्रणा आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी येत्या काही वर्षात रेल्वेत दोन लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या रेल्वेच्या सुरक्षा विभागात १६ टक्के जागा रिक्त असून या जागा भरण्यासाठीच भरती करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात वारंवार रेल्वे अपघात होत आहेत. मुळात १६ टक्के जागा रिक्त आहेत आणि आता या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही जम्बो भरती करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात उत्कल एक्सप्रेस १९ ऑगस्ट रोजी रूळावरून घसरली होती. त्यानंतर रेल्वेच्या मेंटेनन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. या अपघातात २१ प्रवाशांना प्राणांस मुकावे लागले होते. गेल्या तीन वर्षात रेल्वे अपघातात कमीत कमी ६५० प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेतील त्रुटी दूर करण्यासाठी रेल्वेत १५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.


गेल्या तीन वर्षाची रेल्वे अपघाताची आकडेवारी पाहता दरवर्षी सरासरी ११५ रेल्वे अपघात होतात. त्यामुळे आगामी काळात दुरूस्ती आणि सुरक्षा विभागात जास्तीत जास्त कामगार भरती करण्यात येणार असल्याचही या अधिकाऱ्याने सांगितलं. रेल्वे अपघात रोखण्यासाठी गँगमन आणि रेल्वेरूळाची पाहणी करणाऱ्या कामगारांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. रेल्वे रूळाची पाहणी करण्यासाठी १०० हून अधिक तपासणी वाहने खरेदी करण्याचा विचार आहे. शिवाय रेल्वे रूळाला तडे गेल्यास त्याची तात्काळ माहिती देणारी सेंसर टेक्नॉलॉजीही सुरू करण्यात येणार असल्याचं या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे या ठिकाणी २ लाख नवीन कर्मचारी भरण्यात येणार आहेत.