मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशात भीतीचे वातावरण आहे. देशातील 30 राज्यात लॉकडाऊन आहे, अनेक जिल्ह्यात कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना घरात राहण्यास सांगितले जात आहे. कोरोनाच्या भीतीने भारतीय रेल्वेही बंद आहे, म्हणून आता रेल्वे मंत्रालय लोकांना घराबाहेर पडू नये म्हणून आवाहन करीत आहे. ज्या प्रकारे रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत आवाहन केलं आहे. त्यावरुन परिस्थितीचं गांभीर्य खरंच लक्षात येतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी रात्री रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत म्हटलं की, 'भारतीय रेल्वे युद्धकाळातही थांबली नाही. कृपया परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या. आपल्या घरीच थांबा.'



देशाच्या इतिहासात प्रथमच प्रवासी रेल्वे थांबविण्यात आली आहे. सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आणि फक्त मालगाड्या चालविण्यास परवानगी आहे. अशा परिस्थितीत, रेल्वे आता लोकांना सांगत आहे की आपण घरीच राहावे.


केवळ रेल्वे सेवाच नाही तर देशातील विविध शहरांमध्ये सुरू असलेली मेट्रोही बंद झाली आहे. दिल्ली, नोएडा, कोलकाता, बंगळुरू, मुंबई, कोची, नागपूर आणि इतर मेट्रो सेवा 31 मार्चपर्यंत बंद आहेत.


याशिवाय मंगळवारी रात्री १२ पासून देशाअंतर्गत विमान सेवांनाही बंदी घातली गेली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंदी घालण्यात आली होती आणि इतर देशातील लोकांना भारतात येण्यास बंदी घातली गेली आहे.


कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता अनेक राज्य सरकारांनी आंतरराज्यीय बससेवा ही थांबविली आहे, काही राज्यांनी आपल्या भागात चालणारी बस सेवाही बंद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 500 च्या जवळपास पोहोचली आहे.