नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतातील कोरोना रुग्ण संख्या 31 लाखांवर गेली आहे. गेल्या 24 तासात देशात 60 हजार 975 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर एका दिवसात 848 जणांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील कोरोनाग्रस्तांची आतापर्यंतची एकूण संख्या 31 लाख 67 हजार 342 इतकी झाली आहे. तर भारतात कोरोनामुळे 58 हजार 390 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्या सतत वाढत असली, तरी गेल्या काही दिवसांपासून मृत्यचं प्रमाण कमी झाल्याचं चित्र आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर सुधारला असल्याची काहीशी दिलासादायक बाब आहे. सध्या देशात 7 लाख 4 हजार 348 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 24 लाख 4 हजार 585 जण कोरोनातून बरे झाले आहेत. 



24 ऑगस्टपर्यंत देशात एकूण 3,68,27,520 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर सोमवारी एका दिवसात 9,25,383 चाचण्या घेण्यात आल्याची माहिती ICMRकडून देण्यात आली आहे. देशात एकिकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच दुसरीकडे या संसर्गावर मात करणाऱ्यांची संख्याही काही अंशी वाढताना दिसत आहे.


जगभरातील जवळपास 180 हून जास्त देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या व्हायरसमुळे जवळपास 2.34 कोटी जण अनेक अडचणींचा सामना करत आहेत. तर, 8.08 लाखांहून जास्त कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.