नवी दिल्ली: देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेतल्याशिवाय अर्थव्यवस्थेची प्रगती होऊ शकत नाही, असे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी रायपूरमधील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, जोपर्यंत लोकसभा आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेत सामान्य भारतीयांचा आवाज ऐकला जात नाही तोवर अर्थव्यवस्था आणि रोजगाराचे काहीच होऊ शकत नाही. किंबहुना सर्व जातीधर्मांना सोबत घेतल्याशिवाय अर्थव्यवस्थेची प्रगती होऊ शकत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींचा 'हा' डान्स पाहिलात का?


नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (NRC) मुद्द्यावरून काँग्रेस सध्या आक्रमक भूमिकेत आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी गुवाहाटी येथील सभेतही याच मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, आसाम करार मोडीत निघता कामा नये. आम्ही आसामला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणात जाऊ देणार नाही. नागपूरातील चड्डीवाले आसाम चालवू शकत नाहीत. येथील जनताच आसामचा कारभार चालवेल. आम्ही आसामची संस्कृती आणि भाषेवर भाजप व संघाचे आक्रमण होऊ देणार नाही, असेही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. 



भाजप देशातील सध्याची परिस्थिती अयोग्यप्रकारे हाताळत आहे. जर लोकांना शांतपणे त्यांचे म्हणणे मांडायचे असेल तर त्याठिकाणी हिंसा आणि गोळीबार करण्याची गरज नाही. लोकांचे म्हणणे प्रेमाने ऐकून घेतले पाहिजे. मात्र, भाजपला लोकांचा आवाज ऐकायचाच नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.