Crude Oil : जे दुसऱ्यांवर अवलंबून आहेत, त्यांनी आम्हाला सांगू नये; भारताने अमेरिकेला सुनावले
Crude Oil : भारताने रशियाकडून स्वस्तात तेल घ्यावं की घेऊ नये हे तेलात स्वयंपूर्ण असलेल्यांनी किंवा अद्याप रशियाकडून इंधन घेणाऱ्या देशांनी शिकवू नये, अशा शब्दांत भारताने टीकाकार देशांना उत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : Crude Oil : भारताने रशियाकडून स्वस्तात तेल घ्यावं की घेऊ नये हे तेलात स्वयंपूर्ण असलेल्यांनी किंवा अद्याप रशियाकडून इंधन घेणाऱ्या देशांनी शिकवू नये, अशा शब्दांत भारताने टीकाकार देशांना उत्तर दिले आहे.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादलेत. त्यानंतर रशियाने रुपया-रुबल विनिमयात भारताला कच्चे तेल देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर भारतात विचार सुरू असतानाच अमेरिका आणि युरोपातील देशांनी टीका सुरू केली होती.
युरोपमधील देश अद्याप रशियाकडून गॅस घेत असताना भारताला मात्र सल्ले दिले जात होते. भारतात स्वतःचे तेलसाठे नसल्यामुळे अशा कोणत्याही ऑफरचं स्वागतच केलं जाते. भारतीय उद्योजकही जागतिक बाजारात चांगल्या व्यवहाराच्या शोधात असतात, असे विधान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी केले. भारताला स्पर्धात्मक ऊर्जा स्त्रोतांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आम्ही सर्व उत्पादकांकडून अशा ऑफरचे स्वागत करतो, असे ते म्हणाले.
रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी आक्रमणानंतर पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलावर सवलतीची ऑफर दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्याची शक्यता नाकारलेली नाही. भारत तेलाचा प्रमुख आयातदार म्हणून प्रत्येक वेळी सर्व पर्यायांचा विचार करतो, असे ते म्हणाले.
भारत आपल्या तेलाच्या बहुतांश गरजा आयात करतो, ते आयातीद्वारे पूर्ण केले जाते. त्यामुळे आम्ही नेहमी जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील सर्व शक्यतांचा शोध घेत असतो. कारण या परिस्थितीमुळे आम्हाला आमच्या तेलाच्या गरजा आयात करण्याचा सामना करावा लागतो, असे त्यांनी सांगितले. बागची म्हणाले की, रशिया भारतासाठी कच्च्या तेलाचा प्रमुख पुरवठादार आहे.