गुवाहाटी : भारतातली सगळ्यात वृद्ध वाघिण स्वातीचा मृत्यू झाला आहे. आसामच्या गुवाहाटी प्राणी संग्रहालयामध्ये स्वाती होती. २८ जानेवारी १९९७ला स्वातीचा जन्म झाला होता. वयाच्या २१व्या वर्षी स्वातीचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून स्वाती आजारी होती. दिवसेंदिवस स्वातीची दृष्टीही कमी होत होती तसच तिचं वजनही कमी झालं होतं. गुवाहाटीतल्या प्राणी संग्रहालयामध्ये तिची योग्य काळजी घेतली जात होती. पण रविवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. 


१९९७ला मैसूरच्या प्राणी संग्रहालयामध्ये स्वातीचा जन्म झाला होता. २००५ साली स्वातीला गुवाहाटीच्या प्राणी संग्रहालयात आणण्यात आलं. मैसूरमध्ये स्वातीनं पाच छाव्यांना जन्म दिला होता तर गुवाहाटीमध्ये आल्यावर तिनं सहा बंगाल टायगरनं जन्म दिला. यातली बिरीना ही वाघिण आत्ताही आसामच्या प्राणीसंग्रहालयात आहे. तर दोन वाघांचा आसाममध्येच मृत्यू झाला. उरलेला एक वाघ जमशेदपूरच्या टाटा झूलॉजिकल पार्कमध्ये आणि दुसरा रायपूरच्या नंदनवन झूमध्ये आहे. 


साधारणत: जंगलात असणारा बंगाल टायगर १४ ते १६ वर्ष जगतो आणि पिंजऱ्यातला वाघ सरासरी १८ वर्षांपर्यंत जगतो. स्वातीचं २१ वर्षांचं जगण हे माणसाच्या १०० वर्षांच्या जगण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया गुवाहाटी प्राणी संग्रहायलाचे डीएफओ तेझाझ मनस्वामींनी सांगितलं आहे. कानपूरच्या प्राणी संग्रहालयातला गुड्डू वाघ हा भारतातला सगळ्यात जास्त जगलेला बंगाल टायगर आहे. गुड्डूचा २०१४ साली २६ वर्षांचा असताना मृत्यू झाला. 


स्वातीच्या मृत्यूमुळे आता आसामच्या प्राणी संग्रहालयात फक्त वाघिणीच शिल्लक आहेत. यातल्या दोन बंगाल तर दोन पांढऱ्या वाघिणी आहेत. प्राणी संग्रहालयामध्ये नवीन वाघ आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मनस्वामी म्हणालेत. आसामच्या प्राणी संग्रहालयात असलेला एकमेव वाघ लचितचा मेंदूच्या इजेमुळे २७ जूनलाच मृत्यू झाला होता. लचितला २००९मध्ये स्वातीनंच जन्म दिला होता.