पगार १८ हजार संपत्ती मात्र २० कोटींची...
महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका सर्वसाधारण कर्मचाऱ्याची संपत्ती फारफार तर किती असेल?
मुंबई : महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका सर्वसाधारण कर्मचाऱ्याची संपत्ती फारफार तर किती असेल? तुम्ही कितीही अंदाज लावा. तो चुकीचाच ठरणार आहे. कारण इंदुरच्या महानगरपालिकेत काम करणाऱ्या एक कर्मचारी तब्बल २० कोटींचा मालक आहे. इंदुरमध्ये त्याची ५ आलिशान घरं आहेत. त्याचबरोबर घरात २ किलो सोनं, १५ लाख रोख आहे. याशिवाय त्याची अजूनही संपत्ती असून त्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या इसमाचे नाव आहे असलम खान.
याशिवाय आहे ही संपत्ती
असलम खानच्या पाच ठिकाणी असलेल्या घरात पोलिसांनी धाड टाकली असून देवास, महू भागातील त्याच्या जमिनी, दोन दुकाने, घरांचे दस्तऐवज, लाखो रुपये किंमतीचे दागिने आणि बॅंक खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याव्यतिरिक्त एक फ्लॅट, तीन चारचाकी वाहने असून त्यात एसी सुविधा आहे. यात एक सेडान कार आणि एक क्लासिक जीप आहे.
पगार मात्र...
असलम हा इंदूर महानगरपालिकेत कामाला असून त्याला १८ हजार रुपये पगार आहे. त्यामुळेच त्याच्याकडे इतकी मालमत्ता कोठून आली, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तरीही कारवाई नाही?
पण अधिकाऱ्यासोबत असलेल्या चांगल्या संबंधांमुळेच तो बचावला, अशी चर्चा आहे. यापूर्वी अनेकदा निलंबित करुनही पुन्हा त्याला कामावर रुजू करुन घेण्यात आले होते. माजी आयुक्त सी.बी. सिंग यांनी तीनदा तर तत्कालीन आयुक्त मनीष सिंग यांनी त्याला एकदा निलंबित केले. पण पुन्हा त्याला बिलावली झोनमध्ये रुजू करुन घेण्यात आले. अनेक बिल्डर्स आणि ठेकेदारांनी त्याचे चांगले संबंध होते आणि तो बांधकामाचे नकाशे पास करायचा अशी माहिती समोर आली आहे.