सात मुलींना रात्रभर हॉस्टेलबाहेर राहण्याची दिली शिक्षा
अहिल्या देवी विद्यापीठातील सात विद्यार्थीनींना हॉस्टेलमधून रात्रभर बाहेर राहण्याची शिक्षा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
इंदूर : अहिल्या देवी विद्यापीठातील सात विद्यार्थीनींना हॉस्टेलमधून रात्रभर बाहेर राहण्याची शिक्षा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
झालं असं की, गेल्या आठवड्यात अहिल्या देवी विद्यापीठातील सात विद्यार्थीनी कुणाचीही परवानगी न घेता गरबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांना हॉस्टेलमधील रुममधून बाहेर काढत डॉर्मिटोरीमध्ये राहण्यास सांगितले.
विद्यापीठातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सातही विद्यार्थीनी २८ सप्टेंबर रोजी कुणाचीही परवानगी न घेता गरबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. गरबा पाहून त्या रात्री ११.३० वाजता परतल्या. त्यानंतर शिक्षा म्हणून त्यांना रात्रभर हॉस्टेलमध्ये रात्रभर प्रवेश दिला नाही.
मुलींना रात्रभर हॉस्टेल बाहेर राहण्यास सांगितल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात कुलगुरुंना विचारले असता त्यांनी म्हटलं की, या मुली हॉस्टेल प्रशासनाला न विचारताच गरबा पाहण्यासाठी गेल्या होत्या आणि रात्री उशीरा परतल्या. त्यावेळी त्यांना स्वत:च्या सुरक्षेची जाणीव का झाली नाही.
या मुलींना शिक्षा म्हणून ड्रॉर्मिटोरीमध्ये झोपण्यास सांगितले गेले. डॉर्मिटोरी म्हणजे एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी अनेक लोकांची झोपण्याची व्यवस्था असते. तर, हॉस्टेलमधील मुलींना झोपण्यासाठी छोट्या रुम्स दिल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणी या सात विद्यार्थीनींनी अद्याप कुठलीही प्रतिक्रीया दिलेली नाहीये.
तर, या प्रकरणी विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी)च्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या ग्रीष्मा त्रिवेदी यांनी म्हटलं की, विद्यापीठ प्रशासन विद्यार्थीनींसोबत अन्याय करत आहे. सुरुवातीला त्यांना रात्रभर हॉस्टेलच्या बाहेर राहण्यास सांगितलं. मात्र, आता त्यांना डबल शिक्षा सुनावत आपले रुम्स खाली करण्यास सांगितलं आहे. मात्र, आम्ही याचा विरोध करु.