लखनऊ: आपण आजपर्यंत भीषण अपघाताच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मात्र, नुकत्याच उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात हा प्रकार घडला. याठिकाणी संघमित्रा एक्स्प्रेसने प्रवास करणारा सुनील चौहान हा तरुण ट्रेनमधून अपघाताने खाली पडला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याच्या पोटातील आतडे बाहेर आले. मात्र, सुनीलने हिंमत न हारता थोडेथोडके नव्हे तर तब्बल ९ किलोमीटर अंतर चालून रुग्णालय गाठले. या घटनेने अनेकांना आ वासायला भाग पाडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील चौहान (२४) हा तरुण आपल्या भावांसह संघमित्रा एक्स्प्रेसने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान सुनील स्वच्छतागृहात जाण्यासाठी उठला होता. मात्र, त्यावेळी सुनीलचा तोल जाऊन तो चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला. पहाटेची वेळ असल्याने आजुबाजूला कोणीही नव्हते. त्यामुळे सुनील ट्रेनमधून पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. 


सुनील खाली पडला त्यावेळी ट्रेन खूपच वेगात होती. त्यामुळे सुनीलच्या पोटाला जबर मार लागून त्याचे आतडे बाहेर आले. मात्र, यानंतरही सुनीलने हिंमत एकटावली आणि आतडे पोटामध्ये परत ढकलले. आतडे पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून सुनीलने अंगातला शर्ट पोटावर घट्ट बांधला. 


यानंतर अंधारात त्याने ट्रॅकवरून चालायला सुरुवात केली. तब्बल ९ किलोमीटर चालल्यानंतर तो हसमपार्थी या स्थानकापर्यंत आला. यावेळी जखमी व्यक्ती रेल्वे रुळांवरून चालत असल्याचे स्टेशन मास्तरांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने सुनीलला वारंगलच्या महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याठिकाणी सुनीलवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या सुनीलची प्रकृती अजूनही नाजूक असली तरी स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.