पाकिस्तानच्या बॅट कमांडोंकडून हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा
सीमेपलीकडील लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांवर हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तविण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमच्या BAT मदतीने दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर भिंबर गली आणि नौशेरा सेक्टरमधील भारतीय जवानांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सीमा सुरक्षा दलाकडून BSF या परिसरातील गस्त वाढवण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये शिरता यावे यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून BAT त्यांना मदत होऊ शकते. सध्या सीमारेषेच्या परिसरात तशा हालचाली सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. पाकिस्तानच्या BAT दलात लष्करातील कमांडो आणि जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबा यासारख्या संघटनांतील दहशतवाद्यांचा समावेश असतो. या पथकाकडून अनेकदा नागरिकांनाही लक्ष्य केले जाते.
जानेवारी महिन्यात BAT कमांडोंकडून पुंछ भागात एका नागरिकाला ठार मारण्यात आले होते. त्याच्या मृतदेहाचीही विटंबना करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा BAT कमांडोंकडून अशाप्रकरचा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे सध्या सीमारेषेवर भारतीय जवानांकडून डोळ्यात तेल घालून पहारा दिला जात आहे.
तत्पूर्वी शनिवारी सकाळी नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना आज लष्कराच्या जवानांकडून कंठस्नान घालण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी सीमेपलीकडील लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली.