नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले. येत्या २८ ऑगस्टला त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. राम रहीमला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीश सिंह यांनी दोषी ठरवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम रहीम हा आपल्या विचित्र कपड्यांसाठी आणि जीवनशैलीसाठी नेहमीच चर्चेत असतो. नेहमीच वेगवेगळ्या वादात तो असतो. तरीही पंजाब आणि हरियाणाच्या राजकारणात त्याला महत्वाचं स्थान असतं. 


पंजाब-हरियाणातील अनेक मोठे लोक त्याचा आशिर्वाद घेण्यासाठी येतात. पंजाब-हरियाणातील निवडणुकींदरम्यान अनेक पक्षांनी राम रहीमच्या समर्थनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, यावेळी प्रकरण गंभीर आहे. आश्रमातील एका सेविकेने बलात्काराचा आरोप केलाय. तब्बल १५ वर्षांनी या प्रकरणामुळे राम रहीमला तुरूंगाची हवा खावी लागली. चला जाणून घेऊया या स्टाईलिश बाबाच्या आणखी काही गोष्टी....


१ अंकासोबत कनेक्शन :


राम रहीमचा दावा आहे की, त्याचे कोटींपेक्षाही जास्त अनुयायी आहेत. जे भारत आणि इतर देशांमध्ये राहतात. ते सर्वच ‘इंसां’ आडनावाचा वापर करतात. आपल्या गुरूप्रमाणेच समर्थक ब्लू लॉकेट गळ्यात घालतात. हे लॉकेट १ अंकाच्या आकाराचं असतं. याचा अर्थ सांगितला जातो की, ईश्वर एक आहे आणि त्याची ओळखही एकच आहे. 


बालपणापासून शक्ती असल्याचा दावा : 


५० वर्षीय राम रहीमचा जन्म राजस्थानच्या गुरूसार मोढिया नावाच्या गावात झाला. असा दावा केला जातो की, बालपणापासूनच त्याच्याकडे अलौकिक शक्ती आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसरात तो लोकप्रिय झाला होता. त्याचे आई-वडील त्याला लाडाने मीता असं म्हणायचे. सप्टेंबर १९९० मध्ये राम रहीम डेरा सच्चा सौदाचा प्रमुख झाला. 


मुलालाच बनवलं उत्तराधिकारी :


लाखोंच्या संख्येने अनुयायी आहेत आणि त्यांची राजकीय क्षेत्रात उठबस आहे. याच कारणाने उत्तर-पश्चिम भारतात त्याची मोठी ताकद आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे डेरा प्रमुख झाल्यावरही राम रहीमचा परिवाराचा मोह सुटला नाही. नंतर त्याने आपला मुलगा जसमीत सिंह यालाच उत्तराधिकारी केलं. राम रहीमला दोन मुलीही आहेत. 


महागड्या गाड्या आणि चार्टर प्लेन :


डेरा प्रमुख राम रहीमला बाईक आणि कार्सची मोठी क्रेझ आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. यात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, लेक्सस आणि टोयोटा यांचा समावेश आहे. या कार्सने तो आपल्या हिशोबाने मॉडीफाय करतो. डेरा प्रमुखला डिकॉयमध्ये प्रवास करणे अधिक पसंत आहे. ही कार बुलेटप्रूफ आहे. तसेच राम रहीमकडे चार्टर प्लेन आणि आणि त्यासाठी त्याने स्वत:ची धावपट्टीही करून घेतली आहे.


स्वत:च्या सिनेमात वन मॅन आर्मी :


डेराच्या समर्थकांचं म्हणणं आहे की, राम रहीमचे म्युझिक अल्बम सुपरहिट आहेत. असा दावा केला जातो की, या म्युझिक अल्बमच्या एक कोटी प्रती विकल्या गेल्या. बाकी त्यांचे सिनेमे तर सर्वांनाच माहिती आहेत. 


स्वत: केले कपड्यांचे डिझाईन :


राम रहीम हा कुर्ता पायजामा परिधान करून असतो आणि त्याने स्वत:ला ‘गुरू ऑफ ब्लिंग’ घोषीत केलं आहे. त्याच्या वेबसाईटनुसार, तो त्याने डिझाईन केलेलेच कपडे परिधान करतो. त्याच्या सिनेमासाठी त्याने १०० पेक्षा जास्त कपडे तयार केले होते.